दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
तीन इंजिन सरकारमध्ये कुरघोडीच्या राजकारणाला ऊत,
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषणं होणं अपेक्षित होतं.मात्र त्यांना भाषणाची संधी मिळालीच नाही.अजित पवार तर राज्यापाल जाण्याआधीच कार्यक्रमातून निघून गेले.तर एकनाथ शिंदे देखील कार्यक्रमानंतर तडकाफडकी ठाण्याला निघून गेले.आपल्या नेत्याला भाषणाची संधी न मिळाल्यानं शिंदे समर्थक देखील नाराज झाले आहेत. ऐनवेळी कार्यक्रमाच्या नियोजनात कोणी बदल केला हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नुकतेच महाराष्ट्रातील रायगड दौऱ्यावर आले होते.याआधी एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांची भेट घेतली.एकनाथ शिंदे यांनी रविवारी सकाळी अमित शाह यांची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली होती.यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत अन्य कोणीही नव्हते.अमित शाह यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी तब्बल अर्धा तास समोरासमोर चर्चा केली. एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांच्यासोबतच्या या भेटीत काही मुद्द्यांवरुन आपली नाराजी व्यक्त केली.एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्यासमोर निधीवाटपावरुन नाराजी व्यक्त केली.अर्थ खात्याकडून शिवसेनेचे मंत्री व आमदारांच्या फाईल या बाजूला ठेवल्या जात असल्याची बाब शहांच्या लक्षात आणून दिली.त्यांचा रोख राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे होता. एकनाथ शिंदे यांना काही सांगायचं असेल तर ते शहा यांच्याकडे तक्रार करतील,असं वाटत नाही.ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किंवा माझ्याशी ते बोलतील.कारण आमचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत,अशी प्रतिक्रिया अजित पवार व्यक्त केली. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत अजून निर्णय झाला नाही.डीपीसीसाठी त्यांना जो काही निधी द्यायचा आहे,तो सुद्धा आम्ही दिला असुन लवकरात लवकर त्यावर मार्ग निघेल,असे अजित पवार यांनी म्हंटले आहे.
पण या सर्व घडामोडीवरून तीन इंजिनच्या सरकारमध्ये धुसफूस सुरु झाल्याचे स्पष्ट होत आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून शिंदे गटाचे आमदार हे भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. खा.तटकरे हे जलसंपदा विभागाच्या घोटाळ्यात संशयित आरोपी असताना गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भोजन करणे,यावरून शिंदे गटाच्या आमदारामध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

