नवीन पाटील,सफाळे
इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे रेल्वे सेवा ठप्प ; प्रवाशांचे झाले अतोनात हाल,
पश्चिम रेल्वेच्या सफाळे आणि केळवे रोड रेल्वेस्थानका दरम्यान बिकानेर एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने आज दुपारी साधारण साडेतीन ते चारच्या सुमारास गुजरातकडे जाणारी रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती.
पश्चिम रेल्वेकडून इंजिनमधील बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाल्यानंतर अर्धा तासाच्या विलंबानंतर रेल्वेसेवा पूर्ववत झाली.पश्चिम रेल्वेच्या डहाणू व गुजरातच्या दिशेने धावणाऱ्या उपनगरीय रेल्वे सेवांसह लांब पल्ल्याच्या सेवा आज दुपारी अर्धातास ठप्प झाल्या होत्या.भर दुपारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने रेल्वे प्रवासी संतप्त झाले होते. गुजरातकडे जाणाऱ्या बिकानेर एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये सफाळे ते केळवा रोड स्थानकाच्या दरम्यान अचानक बिघाड झाल्यामुळे ती जागीच थांबून होती.तिच्या पाठीमागून येणाऱ्या सर्व उपनगरीय लोकल सेवा यामुळे ठप्प झाल्या होत्या.त्यामुळे डाऊन मार्गावरील लोकल गाड्या आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांवर देखील याचा परिणाम झाला.
गुजरातच्या दिशेने होणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली असली तरी मुंबईकडे जाणारी सेवा मात्र सुरळीत सुरू होती. डहाणूपर्यंत जाणाऱ्या लोकल गाड्या पालघर रेल्वे स्थानकांवर रोखून ठेवण्यात आल्या होत्या.पश्चिम रेल्वेकडून इंजिनमधील बिघाड दूर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केल्यानंतर सुमारे अर्धा तासाच्या विलंबाने रेल्वे सेवा हळूहळू पूर्व पदावर आली.मात्र रेल्वे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

