शशिकांत ठाकूर,कासा
महालक्ष्मी यात्रेत दोन दिवसापासून भाविकांची प्रचंड गर्दी,दर्शनासाठी लांबच लांब रांगा,
पालघर जिल्ह्यातील विवळवेढे – डहाणु येथील प्रसिद्ध महालक्ष्मी मातेच्या पंधरा दिवसीय यात्रेला चैत्र पौर्णिमेपासून प्रारंभ झाला आहे.पहिल्या दोनच दिवसात लाखो भाविकांनी भेट दिली.
गेल्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.वीकेंड आणि त्यासोबत आलेल्या सुट्टी आल्यामुळे आजही भाविकांचा ओघ सुरूच होता.यात्रेनिमित्त स्थानिक प्रशासन आणि मंदिर ट्रस्टकडून भक्तांच्या सोयी सुविधेकडे लक्ष दिले जात आहे.
दरम्यान रूढी व परंपरेनुसार चैत्र पौर्णिमेपासून यात्रेचे आयोजन केले जाते, यात्राकाळात महालक्ष्मी देवीला आकर्षक व नवीन शृंगार करण्याची पद्धत आहे. तर मंदिर परिसर रंगीबेरंगी फुलांच्या आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आले आहे.पहिल्याच दिवशी मातेचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली होती,तर गडावर असलेल्या देवळातही रांगा लागल्या होत्या.
सतत पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रा उत्सवाच्या पहिल्याच दिवशी महालक्ष्मी मातेचा पहिला होम हवन विधी पार पडला.आज शासकीय कार्यालये,शाळांना सुट्टी असल्याने सलग तीन दिवस गर्दी राहील,असा अंदाज मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

