अविनाश मढवी,नालासोपारा
४० दिवसांची फज्र की नमाज पूर्ण करणाऱ्या मुलांना सायकलीचे वाटप,
नालासोपारा येथील झेडपी जकेरिया शाळेत हजरत बिलाल फाउंडेशनतर्फे सलग ४० दिवस ” तकबीर ए उला के साथ फजर की नमाज,” पूर्ण करणाऱ्या लहान मुलांना सायकलीचे वाटप करण्यात आले. सदर नमाज पढण्यासाठी सकाळी साडेपाच वाजता मशिदीत जावे लागते,विशेष म्हणजे लहान मुलांमध्ये धर्माविषयी जागृती व्हावी,तसेच त्यांना सकाळी उठण्याचे चांगली सवय लागावी.जेणेकरून त्यांचा शारीरिक आणि शैक्षणिक फायदा होईल,या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर उपक्रमास सोपारा विभागातील मुलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.एकूण ४७५ मुले या उपक्रमात सहभागी होते.परंतु सलग ४० दिवस नमाज पूर्ण करण्यामध्ये १९३ मुले यशस्वी झाले होते.या सर्व मुलांना सायकली देण्यात आल्या.जेणेकरून त्यांना शाळेत जाण्यास तसेच शरीराचा व्यायाम होण्यास मदत होणार आहे.तसेच इतर ५३ मुलांना ( ज्यांनी ३९ दिवस नमाज अदा केली.) आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.सदर उपक्रम हजरत बिलाल फाउंडेशन यांच्यातर्फे करण्यात आला. यावेळी जमायात उलमाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष हजरत मौलाना हलीमउल्लाह काझमी साहेब तसेच लोकनेते माजी आ.हितेंद्र ठाकूर,माजी आ.क्षितीज ठाकूर तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
” लहान वयातच मुलांना चांगल्या सवयी लागल्यास भविष्यात त्यांना याचा फायदा होतो आणि आपल्या प्रत्येक कामात ते यशस्वी होतात,” असे मत यावेळी हजरत मौलाना साहेबांनी व्यक्त केले. ” एक अतिशय चांगला उपक्रम हजरत बिलाल फाउंडेशनतर्फे घेण्यात आला.यामुळे समाजातील पुढच्या पिढीला योग्य ती दिशा मिळेल” असे मत लोकनेते माजी आ.हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केले .
सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी अफजल सिकंदर डबरे आणि सहकारी यांनी विशेष मेहनत घेतली.

