नवीन पाटील,सफाळे
येत्या १८ ते २० एप्रिल दरम्यान ५ व्या केळवे बीच पर्यटन महोत्सवाचे आयोजन,
पालघर जिल्ह्याच्या समुद्रकिनारी असलेल्या केळवे येथे दरवर्षी केळवा बीच पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात येत असतो.यंदाही हा महोत्सव केळवे बीच पर्यटन उद्योग विकास संघ व ग्रामपंचायत केळवे यांच्या संयुक्त सहकार्याने १८ ते २० एप्रिल दरम्यान ५ वा केळवे बीच पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
आजवर झालेल्या महोत्सवात दरवर्षी कार्पोरेट,सेमी कॉर्पोरेट,स्थानिक मच्छीमार, वाडवळ,आगरी,भंडारी मुस्लिम,आदिवासी समाजातील महिला विविध प्रकारचे पारंपरिक शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावत असतात. कार्पोरेट व सेमी कॉर्पोरेट विभागाचेही १०० हून अधिक स्टॉल्स महोत्सवात मांडण्यात येणार आहेत.
पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे पारंपारिक नृत्य,विविध प्रांतातील नृत्य व संगीत यांची मेजवानी पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे.तीन दिवस चालणाऱ्या महोत्सवात दरवर्षी साधारणपणे १५ ते २० हजार पर्यटक भेट देत असतात,असे आयोजकांचे म्हणणे आहे.
या महोत्सवात मुंबई,ठाणे, कल्याण,नवी मुंबई,डोंबिवली, नाशिक,दीव,दमण,सिल्वासा आणि सुरत,वापी, उंबरगावमधील पर्यटक मोठ्या संख्येने देत असतात.यंदाही पर्यटकांनी केळवे बीच महोत्सवाला भेट देऊन यशस्वी करावे,असे आवाहन केळवे बीच पर्यटन उद्योग विकास संस्थेचे अध्यक्ष संजय घरत यांनी केले आहे. महोत्सवाला पर्यटकांसाठी एसटी सेवेची सुविधा देण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

