वसंत भोईर,वाडा
सेवानिवृत्त जवान नंदन जाधव यांचा सन्मान,
वाडा तालुक्यातील चांबळे येथील सैन्यदलातील जवान नंदन रघुनाथ जाधव हे भारतीय सैन्य दलात २० वर्षे सेवा करून नुकतेच निवृत्त झाले.त्यांचा ग्रामस्थांच्यावतीने कृतज्ञता सन्मान सोहळा करण्यात आला.
नंदन जाधव हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून ते जून २००५ साली सेवेत रुजू झाले होते.हैद्राबाद येथे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पठाणकोट ( पंजाब ) येथे झाली.त्यानंतर ते सलग आठ वर्षे जम्मु काश्मीर येथे कर्तव्यावर होते.त्यानंतर सात वर्षे संभाजी नगर ( औरंगाबाद ) येथे पोस्टिंग होती.त्यांनी चीनच्या सीमेवर दुर्गम ठिकाणी तीन वर्षे सेवा बजावली.अशाप्रकारे भारतीय सैन्यदलातील गौरवास्पद व निष्कलंक सेवा बजावून ते ३१ मार्च २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले.
नंदन जाधव यांचा कृतज्ञता सन्मान सोहोळा हनुमान जयंतीच्या दिवशी आयोजित करण्यात आला होता. सैन्यदलातील सेवेबद्दल ग्रामस्थांच्यावतीने नंदन जाधव यांना कृतज्ञता सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी ( अजित पवार ) गटाचे तालुकाध्यक्ष जयेश शेलार, गोऱ्हे उपसरपंच व तेली समाज युवक अध्यक्ष अनिल खिलारे,मिठाराम बोंद्रे,ग्रामस्थ धनेश पाटील,रमेश पाटील,यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिदास कासार यांनी केले.
यावेळी आभार व्यक्त करताना,नंदन जाधव आपल्या भाषणात म्हणाले,सैन्यदलात सेवा करण्याची संधी मला मिळाली,हे मी माझे भाग्य समजतो,जास्तीजास्त तरुणांनी सैन्यदलात जाऊन देशाची सेवा करावी.

