महिलांना प्रवास तिकीट दरात ५०% सवलत मिळावी- आ.स्नेहा दुबे
वसई विरार शहर महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसमधुन प्रवास करणाऱ्या महिलांना राज्य शासनाच्या धोरणानुसार प्रवास तिकीट दरात ५०% सवलत देण्याची मागणी आ.स्नेहा दुबे पंडित यांनी केली आहे.
या संदर्भात त्यांनी नुकतीच आयुक्त पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.
महाराष्ट्र शासनाने एस.टी. महामंडाळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात ५०% सवलत जाहीर केली असून महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. तसेच एम.एम.आर.डी.ए क्षेत्रातील ठाणे व नवी मुंबई महानगरपालिका प्राधिकरणानेही अशी सवलत देण्यास सुरुवात केली आहे, असे असताना आपल्या वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील महिलांना अद्याप ही सवलत अद्याप दिली नाही, याकडे आयुक्तांचं लक्ष वेधले आहे.
या संदर्भात आ.स्नेहा दुबे पंडित यांनी पालिका आयुक्तां सोबत आज चर्चा केली असता,या योजनेसाठी शासनाकडून अतिरिक्त अनुदान देण्याची मागणी त्यांनी शासनाकडे यापूर्वीच केल्याचे आयुक्तांनी सांगितले.
दुसरीकडे जोपर्यंत शासनाकडून अनुदान प्राप्त होईपर्यंत महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाकडील,महिला व बालकल्याण अंदाजपत्रकाच्या ५% आरक्षित निधीमधुन महानगर पालिकेने या प्रयोजनासाठी खर्च करुन सदरची सवलत तात्काळ सुरू करावी,अशी मागणी आ. स्नेहा दुबे पंडित यांनी आयुक्तांकडे केल्याचे सांगितले.

