संजय लांडगे,वाडा
पालघर जिल्ह्याला मिळणार कामगार विमा योजनेचे पहिले रुग्णालय,
पालघर जिल्ह्यातील नागरिक आणि कामगारवर्गासाठी आज एक निर्णय घेण्यात आला.पालघर जिल्हा व तालुक्यातील मौजे कुंभवली, येथील सर्वे क्र. १७७५/५७ या जागेवर १५० खाटांचे कामगार विमा योजनेचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे.या महत्त्वपूर्ण रुग्णालय प्रकल्पासाठी लागणारी जमीन १ रु.नाममात्र शुल्कावर उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
काल मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
या बैठकीत प्रस्तावित कामगार विमा योजनेच्या रुग्णालयासाठी कुंभवली ( सर्वे क्र. १७७५/५७ ) येथील जमीन १ रु.नाममात्र दरात हस्तांतरित करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.यावेळी उपस्थित सर्व संबंधित विभागांनी रुग्णालयासाठी आवश्यक ती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
खा.डॉ.हेमंत विष्णु सवरा यांनी दिल्लीत केंद्रीयमंत्र्यांची भेट घेऊन तीन महिन्यापूर्वी निवेदन सादर केले होते. त्यांच्या अथक प्रयत्नांना आज यश आले असून,या निर्णयामुळे पालघर जिल्ह्यातील कामगारांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत.
बैठकीत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,खा. डॉ.हेमंत सवरा,जिल्हाधिकारी श्रीमती इंदुराणी जाखड,तसेच विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी व इतर संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि विभागीय प्रतिनिधी उपस्थित होते.
या निर्णयामुळे पालघर जिल्ह्यातील आरोग्य सेवा बळकट होणार असून, सामाजिक पुनर्वसन प्रक्रियेसही गती मिळणार आहे.जिल्ह्यातील आरोग्य सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

