अनंत भोईर,पालघर
पालघर येथे शिंदे गटात बॅनर वॉर जोरात,
राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक हे लोकदरबार व सुरु असलेल्या विकासकामांची पाहणी करण्यासाठी काल पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्या स्वागतासाठी शिवसेनेच्या स्थानिक नेत्याने तुफान बॅनरबाजी केली होती. जिल्ह्यातील आपल्या पक्षाचे वर्चस्व तसेच युतीमधील घटक पक्षाशी असणाऱ्या स्पर्धेत शिवसेना बॅनरबाजीमध्ये सरस ठरली आहे.पण या बॅनरबाजीमुळे शिंदे गटातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आले आहेत.
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक हे सूर्या पाणीपुरवठा योजनेची पाहणी करण्यासाठी आले होते.त्यांनी धामणी धरण व पालघर एसटी विभागीय कार्यालय व आगर या ठिकाणी भेट देऊन नंतर परिवहन मंडळाला दिलेल्या जागेची पाहणी केली.त्यांच्या स्वागतासाठी शिवसेनेच्या लहान मोठ्या नेत्यांनी खानीवडे टोल नाका ते थेट चारोटी,कासापर्यंत मोठ्या प्रमाणात बॅनर लावले होते. तसेच पालघर शहरात जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत येणारा मार्गावर,पालघर शहरात व शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या परिसरात लहान-मोठे आकाराचे असंख्य बॅनर्स मोठ्या संख्येने झळकले होते.
या बॅनर्सवर बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या छायाचित्रांचा समावेश नसल्याने वाद निर्माण झाला असून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम यांनाही बॅनरवर स्थान मिळाले नाही. शिवसेनेतील काही ज्येष्ठ मंडळीची छायाचित्रे बोईसर परिसरातील बॅनरर्समध्ये असताना पालघरमधील काही बॅनर्समध्ये त्यांना वगळण्यात आल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान शिवसेनेच्या युवा शाखेच्या जिल्हा संघटक यांनी पालघर शहरातील प्रमुख भागात लावलेले स्वागताचे बॅनर्स काढून त्या ठिकाणी शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या मोठ्या आकाराची बॅनर्स झळकले होते.त्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद पुढे आला असून काल सायंकाळी लावलेले बॅनर्स कोणी काढले याचा shodh युवा सेनेचे पदाधिकारी घेत आहेत.

