सुरेश वैद्य,पालघर
पालघर जिल्हा परिषदेमध्ये क्यूसीआय संस्थेची पाहणी –१०० दिवस कृती कार्यक्रमांतर्गत गुणवत्तेचा घेतला आढावा,
१०० दिवस कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने भारत सरकारच्या भारतीय गुणवत्ता परिषद ( क्यूसीआय ) या प्रतिष्ठित संस्थेच्या पथकाने आज पालघर जिल्हा परिषदेला औपचारिक भेट दिली.या भेटीदरम्यान जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्यात आले.जिल्हा परिषद इमारतीमधील व्यायामशाळा, ग्रंथालय,स्वच्छतागृहे, प्रशासकीय कक्ष तसेच इतर मूलभूत सुविधा व सेवांचे बारकाईने परीक्षण करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी या पथकाचे स्वागत केले.तसेच त्यांच्या दालनात पथकासोबत चर्चा केली.यावेळी जिल्हा परिषदेची एकूण कार्यपद्धती,योजना अंमलबजावणी आणि नागरिकांपर्यंत सेवा पोहोचवण्याच्या प्रयत्नांची सविस्तर माहिती दिली. यानंतर झालेल्या बैठकीत विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे यांनी पथकासमोर विविध योजनांची माहिती,सध्याची कामगिरी आणि आगामी सुधारणा याविषयी सविस्तर सादरीकरण केले.
या महत्वपूर्ण पाहणीदरम्यान प्रकल्प संचालिका डॉ.रूपाली सातपुते,उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद शरीख मसलत,मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज पांडे तसेच विभागप्रमुख व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.सर्व विभागांनी आपापल्या कार्याचा आढावा सादर केला असून,संस्थेच्या प्रतिनिधींनी विविध मुद्द्यांवर शंका समाधान,मार्गदर्शन आणि गुणवत्ता सुधारण्याच्या उपाययोजना यावर विचारमंथन केले.
संस्थेची ही पाहणी जिल्हा परिषदेच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता,कार्यक्षमतेची खात्री आणि सेवा गुणवत्तेतील सातत्य टिकवण्यासाठी महत्त्वाची असून येत्या काळात या पाहणी अहवालाच्या आधारावर विभागीय कामकाजात आवश्यक सुधारणा राबवण्याचा मानस मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.

