जव्हार प्रतिनिधी,
सहा.जिल्हाधिकारी करिश्मा नायर यांचा शुभेच्छा समारंभ उत्साहात साजरा,
प्रकल्प अधिकारी तथा सहा. जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या करिश्मा नायर ( भा.प्र.से ) यांची पदोन्नती होऊन त्यांची नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.त्यांच्या सन्मानार्थ शुभेच्छा समारंभाचे आयोजन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, जव्हार येथे करण्यात आले होते.
या समारंभाचे अध्यक्षस्थान विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आ.हरिश्चंद्र भोये यांनी भूषवले.आ.भोये यांनी करिश्मा नायर यांनी आदिवासी भागात केलेल्या उल्लेखनीय कार्याची प्रशंसा केली. “ त्या एक संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष अधिकारी असून,त्यांच्या कार्याचा ठसा हा जव्हारकरांच्या मनात सदैव राहील,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
करिश्मा नायर यांच्या कार्यकाळात प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळांमध्ये भौतिक सुविधांचा विकास, शैक्षणिक गुणवत्तेत उल्लेखनीय वाढ,विविध शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचविणे,इएमआरएस शाळेसाठी जागा अधिग्रहण, तसेच सीएसआर अंतर्गत विविध उपक्रमांची अंमलबजावणी,अशी जनहिताची अनेक कामे यशस्वीपणे करण्यात आली.
या प्रसंगी बोलताना नायर यांनी, “ माझ्या कामात यश मिळण्यामागे मला मिळालेली उत्तम टीम,हेच मुख्य कारण आहे.मी सदैव जव्हारच्या अडचणी सोडवण्यास कटिबद्ध राहिले आणि राहीन,” असे सांगत त्यांनी उपस्थितांचे मन जिंकले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहा.प्रकल्प अधिकारी दिपक टिके ( प्रशासन ),सुभाष परदेशी (शिक्षण) आणि नियोजन अधिकारी रास्ते यांनी विशेष मेहनत घेतली.समारंभात विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी,शिक्षक, मुख्याध्यापक,प्रतिष्ठित नागरिक आणि सामान्य जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.
शुभेच्छांचा वर्षाव होत असताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.कार्यक्रम संपल्यानंतर करिश्मा नायर यांच्यावर पुष्पवृष्टी करत त्यांना त्यांच्या वाहनापर्यंत नेण्यात आले. “अशा संवेदनशील आणि परिणामकारक काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची गरज आदिवासी भागाला अजूनही आहे,” अशी भावना लोकांनी व्यक्त केली.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी शेवाळे यांनी केले तर सांगवीकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

