दीपक मोहिते,
” हल्लाबोल,” भाग क्र.१
” ट्रम्प,ट्रम्प,” असे कोकलणाऱ्या पंतप्रधान मोदी यांना ट्रम्प यांनी चांगलाच धोबीपछाड दिला..
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाची झोप उडवली आहे.त्यांच्या एका निर्णयाने अमेरिकेशी व्यापार करणारे सारे देश भितीच्या सावटाखाली आले आहेत.ट्रम्प यांनी २६ % आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक देशाची आर्थिक घडी विस्कळीत होण्याची भिती सर्वत्र व्यक्त होत आहे.त्यांच्या या निर्णयामुळे अमेरिकेच्या बाजारात भारतीय वस्तू प्रचंड महाग होतील व त्याचा थेट फायदा त्यांच्या देशातील उत्पादकांना होणार आहे.यातून ट्रम्प सरकारला प्रचंड असा महसूल मिळणार आहे.या सर्व घडामोडीमुळे भारतीय व्यापारी व शेतकरी उध्वस्त होणार आहेत.मोदी सरकारच्या कृषीविषयक दिशाहीन धोरणामुळे कृषी क्षेत्र गेल्या दहा वर्षांपासून हेलकावे खात असताना ट्रम्प सरकार निर्मित हे अस्मानी संकट आपल्यावर कोसळले आहे.
तुमचे आमचे दुर्देव असे की ज्या दिवशी रात्री दोन वाजता आपले सरकार वक्फ सुधारणा विधेयक मंजूर करून घेण्यात मग्न होते,त्याच सुमारास ट्रम्प सरकार आपल्यावर २६ % टॅरीफ लावण्याची घोषणा करत होते.अमेरिकन सरकार एकीकडे देशहिताचा निर्णय घेत होते,तर दुसरीकडे आपले सरकार मात्र धर्माचे राजकारण करण्यात गुंतले होते.ट्रम्पच्या या निर्णयामुळे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम जाणवणार आहे,त्यामुळे जगभरातील देश अडचणीत आले आहेत.या अस्मानी संकटाला कसे सामोरे जायचे,यावर विचार मंथन सुरू झाले आहे.त्याचवेळी आपण मात्र ट्रम्पच्या या निर्णयाशी कसलंही देणंघेणं नसल्याच्या भूमिकेत वावरत आहोत.आज भारतीय बाजारात प्रचंड मंदीचे वातावरण आहे,ट्रम्पच्या या निर्णयामुळे अनिश्चिततेचे सावट अधिक गडद झाले आहे.” बाहेरच्या देशातील गुंतवणूकदार व व्यापाऱ्यासाठी मी माझी धोरणे कधीही बदलणार नाही,” असे ठासून सांगणारे ट्रम्प कुठे व कायम ” तोंडावर बोट व हाताची घडी,” अशा भूमिकेत वावरणारे आमचे विश्वगुरु नरेंद्र मोदी कुठे ? ट्रम्प यांच्या प्रचारात ” अबकी बार ट्रम्प सरकार,” असे कोकलणाऱ्या मोदींना ट्रम्प यांनी चांगलाच धोबीपछाड दिला आहे.आश्चर्याची गोष्ट अशी की ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफ बाबत मोदी यांनी आतापर्यंत आपल्या तोंडातून अवाक्षर बाहेर काढलेले नाही.
क्रमशः

