वसंत भोईर,वाडा
वाड्यात वादळ वा-यासह जोरदार पाऊस,घरांचे मोठे नुकसान,
वाडा तालुक्यात आज सायंकाळच्या सुमारास वादळ वा-यासह जोरदार पाऊस पडला.या अवेळी आलेल्या पावसाने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली.वादळ वा-यात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली.तर आंबा पिकासह भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.अनेक घरांवरील छप्परे उडल्याने मोठे नुकसान झाले आहे.
घोणसई मेट रस्त्यावर वादळ वा-यात एक झाड उन्मळून पडले,त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद पडली होती.येथे असलेल्या कंपनीने हायड्राच्या सहाय्याने हे तुटलेले झाड रस्त्यावरून हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.मोहोट्याचा पाडा येथे वादळ वा-यात अनेक घरांवरील छपरे उडाली.वादळ वा-यात कांबारे परिसरातील आंब्यांची अनेक झाडे उन्मळून पडली आहेत.त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.अवेळी आलेल्या पावसाने ग्रामीण भागातील नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली.

