जव्हार प्रतिनिधी,
हिरडपाडा येथे विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबीर संपन्न,
श्री गगनगिरी आदिवासी शिक्षण प्रसारक संस्था संचलित एकलव्य प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय, हिरडपाडा,जव्हार येथे दहावी ते बारावीतील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी करिष्मा नायर (भा.प्र.से ) यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.
विद्यार्थ्यांना भावी काळात शिक्षणाची दिशा मिळावी, तसेच योग्य मार्गदर्शनाच्या आधारे आपल्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी करिअर निवडता यावे,असा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.यामध्ये सुमारे १५० विद्यार्थी सहभागी झाले होते.या कार्यक्रमात तज्ञ मार्गदर्शक म्हणून पंचायत समिती जव्हार तालुका व्यवस्थापक पेसा मनोज कामडी यांनी विविध शैक्षणिक आणि व्यवसायिक संधींबाबत मार्गदर्शन केले.त्यांनी आपल्या भाषणात आश्रमशाळेमध्ये मिळणाऱ्या प्रभावी शिक्षणाच्या संधींचा विद्यार्थ्यांनी योग्य उपयोग करावा,असे सांगितले.तसेच तज्ञ मार्गदर्शक राजेंद्र भोईर यांनी शिक्षणाचे जीवनातील महत्त्व, करिअरच्या संधी व शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील अतूट नात्याचे मोल विशद केले.शाळेचे मुख्याध्यापक गणेश उदावंत यांनी शाळेचा विद्यार्थ्यांच्या प्रगतीतील सिंहाचा वाटा अधोरेखित करत,शाळेत राबवण्यात येणारे विविध उपक्रम आणि कौशल्य विकास कार्यक्रम यांचा उल्लेख केला.संस्थेचे अध्यक्ष दिलीप नारायण पटेकर यांनी शाळेमध्ये दरवर्षी अशा प्रकारचे मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात येतात व संस्था नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.सदर कार्यक्रम प्रसंगी शाळेचे प्राथमिक मुख्याध्यापक मेदगे, माध्यमिक शिक्षक दराडे, पडघान,कवळे,ठाकरे, चौधरी,गभाले मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राथमिक शिक्षक नागरगोजे यांनी केले.

