जव्हार प्रतिनिधी,
मुख्याध्यापिका प्रज्ञा शरद मुकणे यांचा भव्य सेवानिवृत्तीचा भव्य सोहळा संपन्न,
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन या गीतेतील उक्तीनुसार आपली जबाबदारी पार पाडणाऱ्याbप्रज्ञा शरद मुकणे ( उच्च श्रेणी मुख्याध्यापिका,जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा काळीधोंड ) या काल वयोमानानुसार सेवेतून सेवानिवृत्त झाल्या.या निमित्ताने शाळा व्यवस्थापन समिती व काळीधोंड शाळेच्या वतीने त्यांचा भव्य सेवापूर्ती सोहळा पार पडला.
या सोहळ्यास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिभाऊ बोरसे अध्यक्षस्थानी होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रावण खरपडे,पंचायत समितीचे माजी गट शिक्षणाधिकारी चौधरी,तसेच धानोशी गटाचे केंद्रप्रमुख चंदनसिंग जगताप उपस्थित होते.याशिवाय केंद्रातील सर्व शिक्षक,शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कारमूर्ती प्रज्ञा मुकणे यांना त्यांच्या कार्यालयातून नवीन शाळेच्या इमारतीपर्यंत शिक्षक, विद्यार्थी व व्यवस्थापन समितीच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझीमच्या तालावर सन्मानाने आणण्यात आले.विद्यार्थ्यांनी रांगोळी काढून त्यांचे औक्षण केले आणि फुलांचा वर्षाव करत स्वागत केले.
कार्यक्रमाची सुरुवात मुलींच्या स्वागतगीताने झाली. प्रास्ताविक सूर्यवंशी यांनी केले.यावेळी ज्योत्स्ना खुताडे,, लता भोये,कुवरे,सुनिता इंगळे, योगीता बोंबाडे,संजय कोकतरे यांनी मुकणे यांच्या शिस्तबद्ध व प्रामाणिक कारभाराचे कौतुक केले.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिभाऊ बोरसे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ” मुख्याध्यापिका मुकणे यांनी केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे,तर शिक्षकांनाही शिस्त लावण्याचे काम केले.त्यांनी आपले कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडले.”
यानंतर मान्यवरांच्या हस्ते सत्कारमूर्ती प्रज्ञा मुकणे व त्यांचे पती डॉ.शरद मुकणे यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.धानोशी केंद्र, काळीधोंड शाळा,शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांकडूनही विशेष सत्कार करण्यात आला.प्रज्ञा मुकणे यांनी आपल्या सेवानिवृत्ती निमित्त शाळेसाठी मोठी सतरंजी भेट दिली,जी समितीने स्विकारली.यावेळी डॉ.शरद मुकणे यांनी आपल्या मनोगतात पत्नीच्या प्रामाणिक आणि निःस्वार्थ सेवेला उजाळा दिला.त्यांनी सांगितले की, “१९८८ साली जव्हार सारख्या आदिवासी भागात आलेल्या प्रज्ञा यांना सुरुवातीला भाषा व उपस्थितीबाबत अडचणी आल्या.पण त्यांनी लोकांच्या भेटी घेत विद्यार्थ्यांची उपस्थिती सुधारली.३७ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले.”
सत्काराला उत्तर देताना प्रज्ञा मुकणे भावूक झाल्या,त्यांनी सांगितले, ” माझ्या सेवानिवृत्ती सोहोळ्याचे इतके भव्य नियोजन होईल,याची कल्पनाही नव्हती.सर्वांनी मला जो मान दिला,तो माझ्यासाठी अनमोल आहे.” त्यांनी उपस्थितांचे आभार मानत विद्यार्थ्यांना नियमित शाळेत येऊन अभ्यास करण्याचा कानमंत्र दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुवरे यांनी अत्यंत सुंदर शैलीत केले संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सुर्यवंशी,शिंदे, जयश्री भोये,योगीता बोंबाडे आणि केंद्रप्रमुख जगताप यांनी केले.

