वसंत भोईर,वाडा
वाडा – गारगाव येथे बोलणारा कावळा,
तालुक्यातील गारगाव या गावी सरगम मुकणे या चौथीत शिकणा-या मुलाने एक कावळा पाळला असून तो कावळा काका,बाबा,आई,ताई अशी हाक मारत असल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हे आश्चर्य पाहण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत.
तालुक्यातील गारगाव हे अतिदुर्गम व जंगल परिसरातील गाव आहे.येथील सरगम मंगळू मुकणे या चौथीत शिकणा-या विद्यार्थांने एक कावळा पाळला असून हा कावळा मुलगा करेल तसे हावभाव करतो.तसेच काका आई,बाबा,ताई असे शब्द स्पष्ट बोलतो.जंगलाला लागून एका फार्म हाऊमध्ये सरगम याचे कुटुंब राहत असून त्यांच्याच सोबत हा कावळा राहत आहे.
दोन वर्षांपूर्वी सरगमला कावळ्याची दोन पिल्ले एका झाडाखाली सापडली होती. त्याने ती त्याच्या घरी आणून पाळली.मात्र यातील एक कावळा मृत्यूमुखी पडला.एक अद्याप जिवंत असून तो आता दोन वर्षांचा झाला आहे.बाहेरचे कावळे येथे येतात,मात्र त्यांच्यात तो मिसळत नाही,असे सरगमने सांगितले. कावळा बोलत असल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात असून त्याला पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.

