वसंत भोईर,वाडा
नववर्ष स्वागत यात्रेने वाडा दुमदुमले
गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत समितीतर्फे वाडा शहरात टाळमृदुंग,ढोल ताशे व लेझीमच्या तालावर हिंदू नववर्षानिमित्त स्वागतयात्रा मोठ्या जल्लोषात काढण्यात आली.या स्वागतयात्रेमध्ये श्रीराम,लक्ष्मण,सीता,हनुमान यांचे देखावे व विविध समाजाच्या संस्कृतीचे दर्शन दाखवणारे देखावे होते.
यात्रेच्या मार्गावर दुतर्फा रांगोळ्या काढून वाडावासीयांनी ऐक्याच्या गुढ्या उभारल्या होत्या.
सकाळी सात वाजता वाडा येथील श्रीराम मंदिर येथून स्वागत यात्रेला सुरुवात झाली.या यात्रेत स्त्री-पुरुष , लहान मुले पारंपारिक वेशभुषा करून सहभागी झाले होते. टाळ मृदुंगाच्या तालावर यात्रेतील नागरिक भजने, भक्ती गीत गात होते.फुगड्या, नाच सुरू होते.ही यात्रा वाणी आळी,भानुशाळी आळी,मुख्य बाजारपेठ,परळी नाका,बस स्थानक पंचायत समिती कार्यालय,आगर आळी, गावदेवी मंदिरापासून पुन्हा श्रीराम मंदिरात तिचा समारोप करून तेथे ऐक्याची गुढी उभारण्यात आली.
या शोभायात्रेत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे सहसंपर्कप्रमुख निलेश गंधे,भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप पाटील, शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे तालुका प्रमुख निलेश पाटील,शहर प्रमुख प्रमोद घोलप,उप शहरप्रमुख तुषार भानुशाली,भरत गायकवाड,भाजपाचे संदीप पवार,मनीष देहेरकर,रोहन पाटील,सामाजिक कार्यकर्ते बापू पातकर,युवराज ठाकरे,बी.के.पाटील आदीसह वाडा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

