संजय लांडगे,वाडा
रोटरी क्लबतर्फे देवळी-मानिवली येथील विद्यार्थ्यांना १५० सौर दिव्यांचे वाटप,
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी रोटरी क्लब ऑफ मुंबई निओ आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे जुहू बीच यांच्या संयुक्त विद्यमाने वाडा तालुक्यातील देवळी-मानिवली विभागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना १५० सौर दिवे वितरित करण्यात आले.हे सौर दिवे एका वेळच्या चार्जिंगनंतर सलग ६ तास उजेड देतात,. त्यामुळे अभ्यासामध्ये अडचण ठरणाऱ्या खंडित वीजपुरवठ्याच्या समस्येवर मात करणे शक्य होणार आहे.विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनुकूल वातावरण निर्माण करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
हे सौर दिवे रोटरी क्लब ऑफ मुंबई निओचे अध्यक्ष आर. श्रीधर आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे जुहू बीचच्या अध्यक्षा मानसी ठक्कर यांच्या सहकार्याने उपलब्ध झाले.या दिव्यांच्या वितरणामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अधिक वेळ उपलब्ध होईल आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला गती मिळेल,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी रोटरी क्लब ऑफ मुंबई निओच्या वतीने येथील नर्सिंग कॉलेजला दूरचित्रवाणी संच आणि प्रिंटरदेखील देण्यात आले,ज्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी होणार आहे.
कार्यक्रमास रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नर आणि या प्रकल्पाच्या समन्वयक कला श्रीधर,रोटरी क्लब ऑफ वाडाचे अध्यक्ष प्रफुल्ल बोकंद, रोटरी सदस्य शशांक ठाकरे, रमेश पाटील,माऊली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विलास गोळे,समाजसेविका गीतांजली भिसे,तसेच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण उपक्रम
रोटरी क्लबच्या या सामाजिक उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे अभ्यासात येणाऱ्या अडचणी दूर होतील. या सौर दिव्यांच्या वाटपामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य प्रकाशमय होईल,असा विश्वास शिक्षक आणि पालकांनी व्यक्त केला.या प्रकल्पाचे उपस्थित मान्यवरांनी आणि स्थानिक नागरिकांनीही भरभरून कौतुक केले.
रोटरी क्लब ऑफ मुंबई निओ आणि बॉम्बे जुहू बीच यांच्या पदाधिकाऱ्यांनी यापुढेही अशाच प्रकारे ग्रामीण भागातील शाळांमध्ये विविध प्रकल्प राबवून विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याची इच्छा व्यक्त केली.

