वसंत भोईर,वाडा
गॅस पाईपलाईन जवळ अनधिकृत उत्खनन,तिघांवर गुन्हा दाखल,
तालुक्यातील खरीवलीतर्फ पौलबारे या गावाच्या हद्दीतून रिलायन्स या कंपनीची गॅस पाईपलाईन गेली असून या पाईपलाईनजवळ अनधिकृत उत्खनन केल्याप्रकरणी तीन इसमांविरोधात वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाई महसूल विभागाने केली आहे.या कारवाईमुळे पाईपलाईन जवळ अनधिकृत उत्खनन करणा-यांचे धाबे दणाणले आहे.
संदिप दुदांराम पाटील,संदिप पुंडलिक पाटील,व्यवस्थापक मेसर्स जि. आर.इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि.व इतर अशी आरोपींची नावे आहेत.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,पालघर व ठाणे जिल्ह्यातून रिलायन्स या कंपनीची गॅस पाईपलाईन गेली असून या वाहिनीपासून काही मीटर अंतरावर खोदकाम उत्खनन करण्यास बंदी घातली आहे,असे असताना खरीवली या गावच्या हद्दीत रिलायन्स कंपनीची किंवा महसूल विभागाची कुठलीही परवानगी न घेता अनधिकृत पणे उत्खनन केले. उत्खननातील दगड व मातीची चोरी केली करून शासनाचा महसूल बुडवला आहे.तसेच सदर इसमांनी गट नंबर २११ प्रियदर्शनी को ऑप इंड्रस्टीयल इस्टेट या जागेत केलेले उत्खनन,हे रिलायन्स कंपनीच्या गॅस पाईपलाईन पासून २०० मीटर दूर असणे आवश्यक असताना देखील त्यांनी नियमांच्या बाहेर जाऊन अनधिकृतपणे उत्खनन केले आहे.
सदर उत्खनन करण्यासाठी त्यांनी ब्लास्टींगचा उपयोग केला आहे.सदर उत्खननामुळे मुळ गॅस पाईपलाईनला धोका उत्पन्न होऊन जिवितहानी होण्याची शक्यता आहे.याची दखल घेत संबंधितावर खानिवलीचे मंडळ अधिकारी तथा फिर्यादी सदानंद भोईर यांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी आरोपींवर कलम २८७,३( ५ )महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम ४८ खाण आणि खनिज (विकास विनियमन)अधिनियम १९५७ चे कलम २१,पेट्रोलियम आणि मिनरल्स पाईपलाईन अँक्ट १९६२ कलम १५ प्रमाणे वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सहा.पोलीस निरीक्षक अजित गोळे करीत आहेत.
प्रकरणाची पडताळणी करून पुढील कारवाई करू, अशी माहिती तपास अधिकारी अजित गोळे यांनी दिली.

