सचिन परब,वसई,
लाखो रु. किमतीचा पोकलेन वापरा अभावी बाद,
वसई (प.) येथील सनसिटी नाल्यामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून महानगरपालिकेच्या मालकीचे ” पोकलेन ” मशीन वापरा अभावी मातीत रुतून बसले आहे. अंदाजे पन्नास लाख रु.पेक्षा अधिक या मशीनची सध्या किंमत आहे.जनतेच्या कर रुपी पैशातून विकत घेण्यात आलेली ही मशीन गेल्या दोन महिन्यांपासून बाहेर काढण्यास महानगरपालिकेचे अधिकारी आणि अभियंत्यांना वेळ मिळालेला नाही ही अत्यंत खेदाची आणि संतापजनक बाब आहे.
नाल्याच्या पाण्यात गंजण्यासाठी आणि नादुरुस्त होण्यासाठी ही मशीन सोडून देण्यात आली असल्याची चर्चा सुरु आहे
१) या वर्षी पावसाळ्यापूर्वी करावयाच्या नालेसफाईचे काम अजूनह सुरू झालेले नाही,या नाल्यात पाणफुटी च्या वेलीही नाहीत,मग हे पोकलेन मशीन कोणत्या कामासाठी या ठिकाणी आणण्यात आले.
ज्या ठिकाणी हे मशीन नाल्यात अर्धवट अवस्थेत बुडले आहे,त्याच्या बाजूच्या नाल्यातील गाळ किंवा वेली काढल्याचा परिस्थितीजन्य पुरावा नाही.मग हे मशीन तेथे कोणत्या प्रयोजनासाठी आणण्यात आले होते ?
लाखो रु.किमतीचे मशीन नाल्यात अर्धवट बुडल्याचे संबंधित विभागाचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि संबंधित अभियंत्यांनी आपल्या वरिष्ठाच्या निदर्शनास आणून दिले का ?
आपल्या निदर्शनास ही घटना आणून दिली असल्यास आपण तातडीने ते मशीन बाहेर काढण्याचे आदेश संबंधितांना का दिले नाहीत ?
आपल्या निदर्शनास ही बाब आणून दिली गेली नसल्यास आपण संबंधितांवर उपरोक्त नुकसानीबाबत काय कारवाई केली ?
हे मशीन आजतागायत का बाहेर काढण्यात आलेले नाही ?
पावसाळ्यापूर्वीच्यां नालेसफाई कामाला आता लवकरच सुरवात होणे अपेक्षित आहे.त्याच वेळी महानगरपालिकेचे स्वतः चे मालकीचे पोकलेन मशीन अशाप्रकारे नादुरुस्त होणे,हे नालेसफाई ठेकेदारांच्या पथ्यावर पडणारे आहे. ठेकेदारांना थेट फायदा व्हावा, यासाठी जाणीवपूर्वक हा प्रकार असल्याची शंका करदात्या नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.दोन महिने होऊनही हे मशीन बाहेर न काढणे,ही आपली निष्क्रिय कृती जनतेच्या मनातील शंकेला बळकटी देत आहे.
हे मशिन तत्काळ बाहेर काढले असते तर कदाचित दुरुस्ती करून ते पुन्हा वापरात आणता आले असते.त्यामुळे करदात्या नागरिकांचा पैसा वाचला असता.मात्र,आता हे मशीन नाल्यातून भंगारात जाणार आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे.
तरी,या गंभीर घटनेस जबाबदार आपले संबंधित विभागाचे सहा.आयुक्त, उपायुक्त आणि संबंधित अभियंता यांना तत्काळ निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेचे ( उबाठा ) प्रवीण म्हाप्रळकर ( उबाठा ) यांनी आयुक्ताकडे केली आहे.

