सुरेश वैद्य,सफाळे
पालघर जिल्हा परिषदेचा ₹ ७६.५४ कोटींचा अर्थसंकल्प जाहीर,
पालघर जिल्हा परिषदेचा ₹ ७६ कोटी ५४ लाख रुपयांचा अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी सादर केला. २०२५-२६ चा मूळ अर्थसंकल्प आणि २०२४-२५ चा सुधारित अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला असून, गतवर्षीच्या तुलनेत,यंदा ६.५० % इतका वाढला आहे.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक डॉ.रूपाली सातपुते, मुख्य लेखा वित्त अधिकारी धनराज पांडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप,लेखाधिकारी विकास पाटील तसेच सर्व विभाग प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
यंदाच्या अर्थसंकल्पात बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य,शिक्षण,कृषी, पशुसंवर्धन,समाजकल्याण, महिला व बालविकास, दिव्यांग कल्याण आणि लघु पाटबंधारे यासारख्या क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे.
महत्त्वाचे मुद्दे आणि विभागनिहाय तरतुदी:
बांधकाम विभाग – ₹ ११.५६ कोटी ( १६ % हिस्सा,११. ११ % वाढ)
गावांतर्गत रस्ते व मजबुतीकरण – ₹ १.४० कोटी,
ग्रामीण व जिल्हा महामार्ग विकास – ₹ १.२५ कोटी
नवीन योजना: जिल्हा परिषद आवारात सोलर पॅनल उभारणे ( ₹ ५० लाख ), गड-किल्ल्यांचे संवर्धन ( ₹ ८० लाख ), नवीन गाळे बांधकाम (₹ २.५० लाख ), आणि बारमाही रस्ते विकसित करणे (₹ ५० लाख).
पाणीपुरवठा – ₹ ६.०२ कोटी ( ९ % हिस्सा,५.०६ % वाढ)
प्रादेशिक नळपाणी योजना देखभाल व दुरुस्ती – ₹ १. ४० कोटी
नवीन योजना: प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांचे Energy Audit ( ₹ ३ लाख ).
शिक्षण – ₹ ७.८५ कोटी ( ९ % हिस्सा, ६८ % वाढ )
जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती, शौचालय व संरक्षक भिंती दुरुस्ती – ₹ २ कोटी
नवीन योजना: इस्रो भेट (₹ ६ लाख), कब-बुलबुल योजना ( ₹ १० लाख ).
आरोग्य – ₹ ५.०५ कोटी ( ६ % हिस्सा,४८ % वाढ )
प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्र दुरुस्ती – ₹ ५० लाख
नवीन योजना: कर्करोग व अॅनिमिया प्रतिबंधक योजना ( ₹ ५७.५०लाख ), किशोरवयीन मुलींसाठी अॅनिमिया तपासणी (₹ २० लाख ).
महिला व बालविकास – ₹ ३.३७ कोटी ( 4 % हिस्सा, २९.६१ % वाढ )
नवीन योजना: सॅनिटरी पॅड व वेंडिंग मशीन बसविणे (₹ ३० लाख ) अंगणवाडी केंद्रांसाठी खेळणी खरेदी ( ₹ ३० लाख ).
कृषी – ₹ ४.०८ कोटी ( ५ % हिस्सा,२७% वाढ )
नवीन योजना: महिला किसान शक्ती पंख योजना ( ₹ १७ लाख ), बांबू लागवड (₹ २० लाख ).
पशुसंवर्धन – ₹ ४.२७ कोटी ( ५ % हिस्सा,३ % वाढ )
नवीन योजना: भटके कुत्रे निर्बिजीकरण ( ₹ १कोटी ), शेतकऱ्यांना कुक्कुटपालनासाठी हॅचरी उपलब्ध करून देणे ( ₹ २० लाख )
दिव्यांग कल्याण – ₹ १.२८ कोटी ( ५% हिस्सा, २१.९ % वाढ )
नवीन योजना: इलेक्ट्रिक ट्रायसायकल योजना ( ₹ १५ लाख ), दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वारली पेंटिंग प्रशिक्षण ( ₹ ५ लाख ).
लघु पाटबंधारे – ₹ ४. ५३ कोटी ( ६ % हिस्सा,४४ % वाढ )
कोल्हापूर पद्धती बंधारे दुरुस्ती – ₹ १.५०कोटी
यावेळी अर्थसंकल्प सादर करताना मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी योग्य नियोजन केल्यास विहित मुदतीत सर्व योजना प्रभावीपणे राबवता येतील. सर्व निधी नियमानुसार खर्च होऊन जनसामान्यांना त्याचा लाभ मिळावा,याकडे विशेष लक्ष द्यावे,असे निर्देश दिले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांनी विकासकामांसाठी समर्पित राहण्याचा संकल्प करत ” विकासाप्रती कटीबद्ध होऊया,” असा संदेश यावेळी दिला.
प्रकल्प संचालक डॉ. रूपाली सातपुते यांनी उमेदच्या महिलांना कलागुणांना वाव देण्यासाठी भरीव निधी मंजूर केल्याचे सांगितले. तसेच, आरोग्य विभागात महिलांच्या अॅनिमिया समस्येवर विशेष लक्ष देऊन त्यासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज पांडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तीन वर्षांत अर्थसंकल्पाच्या रकमेमध्ये जवळपास ₹ ३० कोटींची वाढ झाल्याचे नमूद केले.
पालघर जिल्हा परिषदेकडून शासनाकडील ₹ ५१.३४ कोटींच्या प्रलंबित निधीसाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. हा अर्थसंकल्प जिल्ह्यातील बांधकाम,आरोग्य,शिक्षण आणि कृषी क्षेत्रात मोठा बदल घडविण्यास मदत करेल. असा विश्वास देखील व्यक्त करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद वित्त विभागाचे आणि इतर विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

