वसंत भोईर,वाडा
सततच्या खोदकामाने कुडूस-चिंचघर-देवघर रस्त्यावर वाहतूककोंडी,
वाडा तालुक्यातील कुडूस -चिंचघर- देवघर रस्त्यावर गुजरात गॅस पाईपलाईन कंपनीकडून गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे.त्यामुळे या मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. सतत होणाऱ्या खोदकामामुळे रस्त्याचीही पार दुरावस्था झाली आहे.रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे सध्या अतोनात हाल आहेत.
प्रशासनाने याप्रकरणी गंभीर दखल घेऊन संबंधित कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे पालघर जिल्हा अध्यक्ष प्रफुल पाटील यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.कुडूस-चिंचघर- देवघर हा अत्यंत वर्दळीचा रस्ता असून,या रस्त्यावर मोठ्याप्रमाणावर अवघड वाहनाची वाहतूक होत असते. अशा परिस्थितीमध्ये या खोदकामामुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीने नागरिकांचा जीव मेटाकुटीस आला आहे.सध्या या रस्त्यावरून प्रवास करणे अत्यंत धोकादायक बनले आहे. नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या कामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पाटील यांनी निवेदनात केला आहे.
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय डोंगरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

