वसंत भोईर,वाडा
वाडा नगरपंचायतीत दलित वस्ती निधीचा अपव्यय,
वाडा नगरपंचायतीमध्ये सध्या अनागोंदी कारभार सुरू असून दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत रस्ता,गटार व सुशोभिकरणाची कामे सुरू आहेत.ही सर्व कामे अंदाजपत्रकानुसार न होता भरमसाठ दराने होत आहेत. तसेच ही बांधकामे नित्कृष्ट दर्जाची होत आहेत.ठेकेदार आपल्या मर्जीनुसार कामे करीत आहे तर याच निधीतून एका खाजगी सोसायटीत सुशोभीकरणाचे काम करण्यात येत आहेत.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर अनुसूचित जाती जमाती कायद्यांतर्गत कारवाई करावी अशी मागणी येथील रहिवाशांनी वाडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
रहिवासी तक्रारीत म्हणतात,सिद्धार्थ नगर ते रोहीदास नगर या रस्त्याच्या सिमेंट काॅंक्रीटीकरणाचे काम काही वर्षापूर्वी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण निधीतून करण्यात आले होते. आता तोच
रस्ता व गटाराचे काम नव्याने करण्यात आले असून ही दोन्ही कामे अंदाजपत्रकानुसार न करता ठेकेदाराच्या मर्जीनुसार करण्यात आली आहेत.गटार बांधकामामध्ये स्टील व आवश्यक साहित्याचा वापर करण्यात आला नाही. फक्त खडी सिमेंटने गटारे बांधली आहेत.गटार बंदिस्त केली असून त्यावर झाकण ( चेंबर ) झाकणे लावण्यात आली नाहीत.त्यामुळे गटारात पाणी तुंबून दलित वस्तीमध्ये रोगराई पसरण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
तक्रारीत पुढे ग्रामस्थ म्हणतात,पंचायत समिती कार्यालयासमोर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाजगृहाचे काम गेल्या काही वर्षापूर्वी करण्यात आले.समाजगृहाच्या दुरूस्तीचे काम वारंवार करून निधीचा अपव्यय केला असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.दलित समाजाचे महार चवाठा देवस्थान असून या देवस्थानाच्या मंदिराच्या भागात दगडीपाया असताना तो रात्रीच्या वेळी तोडण्यात आला आहे.एका खाजगी सोसायटीत दलित निधीचा वापर करून सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले असल्याचा आरोप तक्रारीत नागरिकांनी केला आहे.
दलित वस्तीतील नागरिकांना विश्वासात न घेता मनमानी पध्दतीने नगरपंचायत प्रशासन काम करीत असून या संपूर्ण कामांची चौकशी करून दोषींवर अनुसूचित जाती जमाती कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी सिद्धार्थ नगरच्या रहिवासींनी केली असून या तक्रारीवर ५३ ग्रामस्थांच्या स्वाक्ष-या आहेत.
प्रतिक्रीया
वाडा नगरपंचायत प्रशासन,हे मनमानीपणे कारभार करीत असून दलित वस्ती निधीचा अपव्यय करीत आहे.आम्हा ग्रामस्थांना कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता काम करीत आहेत.ठेकेदारांच्या हितासाठी नगरपंचायत प्रशासन काम करीत आहे.या प्रकारणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.
राजेंद्र थोरात,
ग्रामस्थ, सिद्धार्थ नगर वाडा
कोट
सिध्दार्थ नगरच्या रहिवासींनी केलेल्या तक्रारीबाबत त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या शंकांचे निराकरण करण्यात आले आहे.
मनोज पष्टे
मुख्याधिकारी, वाडा नगरपंचायत,

