जव्हार, प्रतिनिधी,
हिरडपाडा माध्यमिक आश्रम शाळेचा ” मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा,” अभियानात भरीव यश,
महाराष्ट्र शासनाच्या ” मुख्यमंत्री माझी,शाळा सुंदर शाळा,” – टप्पा 2 या उपक्रमांतर्गत पालघर जिल्ह्यातील शाळांची स्पर्धात्मक मूल्यमापन प्रक्रिया पार पडली.या अभियानात जव्हार तालुक्यातील श्री गगनगिरी आदिवासी शिक्षण प्रसारक संस्था संचलित, एकलव्य माध्यमिक आश्रमशाळा,हिरडपाडा या शाळेने तालुका स्तरावर प्रथम क्रमांक आणि जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश मिळवले आहे.
राज्यातील शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण करून आदर्श शाळांचे उदाहरण उभे राहावे,यासाठी शासनाने ५ ऑगस्ट २०२४ ते ४ सप्टेंबर २०२४ या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रभर हे अभियान राबवले.पालघर जिल्ह्यातील तब्बल ३ हजार १९८ शाळा या अभियानात सहभागी झाले होते. शासकीय,अनुदानित आणि खाजगी शाळांच्या मूल्यमापनासाठी केंद्रस्तरीय, तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय समित्यांनी मूल्यांकन केले.
जव्हार तालुक्यातील दुर्गम भागात असलेली ही निवासी शाळा इयत्ता पहिली ते बारावी ( कला व विज्ञान शाखा ) पर्यंतचे शिक्षण देते.येथे एक हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.शासनाने ठरवलेले सर्व निकष पूर्ण करत शाळेने ही उल्लेखनीय कामगिरी केली.शाळेचे मुख्याध्यापक गणेश श्रीकृष्ण उदावंत यांच्या नेतृत्वाखाली शाळेने नाविन्यपूर्ण उपक्रम, भौतिक सुविधा,दर्जेदार शैक्षणिक पद्धती व आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे.त्याचबरोबर शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मेहनतीने शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता स्तरात सातत्याने सुधारणा होत आहे.
शाळेच्या या गौरवशाली यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दिलीप नारायण पटेकर यांनी आनंद व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच,माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक गणेश उदावंत,माध्यमिक शिक्षक दराडे,ठाकरे,कवळे मॅडम,पडघान,मुख्याध्यापक मेदगे,वस्तीगृहप्रमुख बडगुजर,तसेच सर्व प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन करण्यात आले.शाळेच्या या घवघवीत यशामुळे संपूर्ण तालुक्यात आणि जिल्ह्यात हिरडपाडा माध्यमिक आश्रमशाळेचे नाव अभिमानाने घेतले जात आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग व उपक्रम राबवत ही शाळा भविष्यातही अशीच उत्तुंग भरारी घेत राहील,असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.

