जव्हार प्रतिनिधी,
व्याख्याते व शिक्षक नितीन आहेर शैक्षणिक व सामाजिक कार्य पुरस्काराने सन्मानित,
समाजहित आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी भरीव योगदान देणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने माणुसकी मल्टिपर्पज फाऊंडेशन,मलकापूर यांच्या वतीने ” राष्ट्रभक्ती सेवा पुरस्कार २०२५, ” राज्यस्तरीय वितरण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात पालघर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध सुत्रसंचालक तथा व्याख्याते
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक नितीन वामनराव आहेर यांना ” शैक्षणिक व सामाजिक कार्य पुरस्कार,” देऊन सन्मानित करण्यात आले. शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नितीन आहेर यांचे सामाजिक कार्यात नेहमीच योगदान असुन कोरोना काळात त्यांनी आरोग्य विभागाला अडीच लाखांचा कोविड निधी मिळवुन दिला आहे.स्वच्छता अभियानात त्यांचे भरीव कार्य असुन तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी त्यांना ” अचिव्हर ऑफ द विक, ” म्हणून सन्मानित केले होते.तसेच व्याख्यानाच्या माध्यमातून ते युवकांना प्रेरणा देत असतात.
या पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष सूर्यवंशी होते,तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ.अतुल सूर्यवंशी,प्रसिद्ध शिक्षणतज्ञ, जळगाव आणि सचिनभाऊ भंसाली अध्यक्ष,ओम शांती सेवा समिती,मलकापूर उपस्थित होते.सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन नितीन आहेर यांना गौरवण्यात आले.
या सोहळ्यात राज्यभरातील विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र देवरे यांनी केले,तर संपूर्ण आयोजनासाठी माणुसकी मल्टिपर्पज फाऊंडेशन, मलकापूरचे पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

