वसंत भोईर,वाडा
वाड्यात सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर,
तालुक्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून वाडा तालुका देखरेख संघ,वाडा ग्रुप सेवा सहकारी संस्था,चांबळे सेवा सहकारी संस्था,आंबिस्ते सेवा सहकारी संस्था या चार सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुका येत्या एप्रिलमध्ये होणार आहेत.या संस्थांची निवडणूक १९एप्रिल रोजी होणार असून १३ ते २० मार्च पर्यंत नामनिर्देशन पत्र सादर करण्याची करायची आहेत.तर २४ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान माघार घेता येणार आहे.
वाडा तालुका देखरेख संघ ही वाडा तालुक्यातील सेवा सहकारी संस्थांची शिखर संस्था आहे.या संस्थेची इमारत असुन त्यामध्ये व्यापारी गाळे व संस्थेचे प्रशस्त कार्यालय आहे.मात्र तांत्रिक कारणामुळे ही इमारत वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.आगामी पंचवार्षिक निवडणुकीत नव्याने निवडून येणारे संस्थेचे पदाधिकारी या वादग्रस्त इमारतीचा तिढा कसा सोडवतात,याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.वाडा ग्रुप सेवा सहकारी सोसायटीमध्ये एकूण १ हजार ६९६ सदस्य आहेत. तर मतदारसंख्या १ हजार २५१ इतकी असून या संस्थेत एकूण तालुक्यातील २४ गावांचा समावेश आहे. या सोसायटीची वार्षिक उलाढाल आठ ते नऊ कोटी इतकी आहे.संस्थेमध्ये अनेक मातब्बr राजकारणी सदस्य असल्याने या संस्थेच्या निवडणुकीकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागले आहे. तर चांबळे सेवा सहकारी संस्थेची आतापर्यंत बिनविरोध निवडणुकीची परंपरा असून या संस्थेच्या माध्यमातून लडकू दत्तात्रय शेलार यांनी वाडा तालुका खरेदी-विक्री संघाचे उपसभापतीपद भूषवले होते. या संस्थेत बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राहते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

