अनंत भोईर, पालघर,
आरोग्यमंत्र्यांचा पालघर जिल्ह्याचा धावता दौरा,आरोग्य व्यवस्थेची पाहणी,
पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची पाहणी करण्याकरिता राज्याचे आरोग्य कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश अबिटकर यांनी काल पालघर जिल्ह्याचा दौरा केला.
या दौऱ्यात मंत्री महोदयांनी येत्या सहा महिन्यात मनोर येथील ट्रॉमा केअर सेंटर व नंडोरे येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत युद्ध पातळीवर नियोजन करणार असल्याचे स्पष्ट केले. पालघर जिल्हा निर्मितीनंतर आपला जिल्हा जरी प्रगतीपथावर असला तरीही पालघर जिल्ह्यात आरोग्यवस्थेबाबत अनेक प्रश्न व समस्या ” जैसे थे,” स्थितीत आहेत.ही बाब नाकारता येणार नाही.पालघर जिल्ह्याकरिता अत्यंत महत्त्वाचे असे मनोर येथील गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेले २०० बेडचे ट्रॉमा केअर सेंटर व नंडोरे येथील २०० बेडचे जिल्हा ग्रामीण रुग्णालय लवकरात लवकर सुरु व्हावे,यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
या अत्यंत महत्त्वाच्या विषयांचा तसेच जिल्ह्यातील एकूणच आरोग्य व्यवस्थेचा आढावा व नियोजन याकरिता राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश अबीटकर यांनी प्रत्यक्ष रुग्णालयाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी तसेच पालघर,डहाणू ,कासा येथील उपजिल्हारुग्णालय,तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. पुढील कार्यवाही करण्यासाठी येत्या सहा महिन्यात अंमलबजावणी होईल, असे जिल्हा वासियांना आश्वस्त केले.
याप्रसंगी पालघर विधानसभेचे आ.राजेंद्र गावित,बोईसर विधानसभेचे आ.विलास तरे,जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मरड,जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष चौधरी,उपनेत्या ज्योती मेहेर, यांच्यासह राज्य व जिल्हा प्रशासनाचे सर्व प्रमुख अधिकारी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

