दीपक मोहिते,
” हल्लाबोल, ”
नितेश राणे इतिहास बदलायला निघाले आहेत,
हल्ली राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री बेताल वक्तव्ये करत असतात.त्यामध्ये भाजपचे नितेश राणे,शिंदे गटाचे संजय शिरसाठ या दोघांचा वरचा नंबर लागतो.मंत्रिपदावर वर्णी लागल्यापासून नितेश राणे यांनी तर ताळतंत्रच सोडले आहे.हलाल मटण,मशीदीत घुसून मारू व आता तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता, असे सांगत इतिहासाची पाने फाडण्याचे प्रकार सुरु केले आहेत.त्यामुळे इतिहास अभ्यासकामध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मुस्लिम धर्मीयांबद्दल सतत बेताल वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंनी वादग्रस्त वक्तव्यांची ही जी मालिका सुरू केली आहे,ती वेळीच आवरणे गरजेचे आहे.
कोणताही आधार नसताना राणे यांनी शिवरायांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता असे स्पष्ट करत आपला एक वेगळा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.त्यांच्या अशा बेताल वक्तव्यामुळे राज्यात त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. वेगवेगळ्या स्तरावरून त्यांच्यावर टीका होत असून, शालेय पुस्तकांचा संदर्भ देत अनेकांनी हा दावा खोडून काढला आहे.नितेश राणे काय म्हणाले पहा जरा,
“आमच्यातील काही टाळकी म्हणतात,शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम होते,हे उगाच टेपरेकॉर्डर चालवतात, स्वराज्याची लढाई ही इस्लाविरोधात होती, हिंदू-मुस्लिम अशी ती लढाई होती.या लढाईत आमच्या राजाने हिंदू धर्म इस्लामसमोर झुकू दिला नाही,हा इतिहास आहे,” छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त कसबा संगमेश्वरमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
महाराष्ट्र शासनाच्या चौथीच्या पुस्तकामध्ये असलेल्या माहितीनुसार शिवरायांच्या जवळच्या सहकाऱ्यांमध्ये सिद्दी हिलाल होते.तसंच त्यांचे अंगरक्षक आणि अनेक जबाबदार पदांवर मुस्लिम मावळे होते.हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदुस्तानात राहणारे असा स्पष्ट उल्लेख चौथीच्या पुस्तकात आहे.शासनाने जे दस्तऐवज अधिकृत ठरवून त्याचा समावेश शालेय पाठ्यपुस्तकात केला,तो दस्ताऐवज खोटा ठरवण्याचा प्रयत्न संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने करावा, याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
स्वराज्यातील प्रमुख पदांवरील मुस्लिम मावळे,
सिद्दी हिलाल : घोडदळातील सेनापती
सिद्दी वाहवाह : घोडदळातील सरदार
सिद्दी इब्राहिम : शिवाजी महाराजांचा अंगरक्षक
नूरखान बेग : स्वराज्याचा पहिला सरनोबत
मदारी मेहतर : महाराजांचा विश्वासू सेवक
काझी हैदर : महाराजांचा वकिल
इब्राहिमखान : आरमारातील अधिकारी
दौलतखान : आरमार प्रमुख
इब्राहिमखान : तोफखान्याचा प्रमुख,
राणे यांच्या वक्तव्याचे पडसाद भाजपमध्येही उमटू लागले आहेत.
भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नितेश राणेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शालजोडीतील ठेवून दिली. राणेंनी वाचलेलं पुस्तक मी वाचलं नसेल,मला माहिती नाही.कदाचित मी तेवढं एकच पुस्तक वाचलं नसेल, शिवरायांसोबत एकही मुस्लिम नव्हता,असं म्हणणं योग्य नाही.त्यांच्यासोबत लढणारे लोक देशभक्त मुस्लिमच होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नितेश राणेंना सल्ला दिला आहे.शिवरायांचा दारूगोळा कोण सांभाळत होतं ? अशी कितीतरी उदाहरणं देता येतील.कायदा व सुव्यस्था अडचणीत येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे,अशा शब्दात अजित पवार यांनी राणे यांना कानपिचक्या दिल्या. तर अमोल मिटकरी यांनी आपल्या एका ट्वीटमध्ये मुस्लिम अधिकाऱ्यांची यादीच शेअर केली आहे.

