जव्हार प्रतिनिधी,
जव्हार येथे महिला स्वयंसहाय्यता समूह निर्मित उत्पादनांचे प्रदर्शन,
नुकत्याच पार पडलेल्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पंचायत समिती,जव्हार येथे महिला स्वयंसहाय्यता समूह निर्मित उत्पादनांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
जिल्हा परिषद,पालघरच्या मा. मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे तथा जिल्हा अभियान संचालक, एमएसआरएलएम-पालघर आणि डॉ.रुपाली सातपुते, प्रकल्प संचालक,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पालघर तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापक एमएसआरएलएम-पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.
ग्रामीण महिलांना त्यांच्या उद्योगांना चालना देण्यासाठी या प्रदर्शनात महिला स्वयंसहाय्यता समूहांनी तयार केलेली विविध उत्पादने सादर करण्यात आली.यामध्ये पापड, नाचणी सत्व,नाचणी लाडू, वारली पेंटिंग, हातसडीचे तांदूळ,उडीद,शेवगा पावडर, गवती चहा,पावडर,तागाची फुले,अशा अनेक वस्तूंचा समावेश होता.
कार्यक्रमाला गटविकास अधिकारी दत्तात्रय चित्ते आणि सहा.गटविकास अधिकारी संदेश दुमाडा यांनी उपस्थित राहून महिलांना प्रोत्साहन दिले.त्यांनी पंचायत समिती अंतर्गत प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांना या स्टॉलवरील वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले,जेणेकरून महिला गटांना आर्थिक पाठबळ मिळू शकेल.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज कामडी,तालुका व्यवस्थापक पेसा,जव्हार यांनी केले.तसेच तालुका अभियान कक्ष,जव्हार येथील अनिल खांडेकर,पंकज वाणी, गुरुनाथ कामडी आणि अमोल भामरे यांच्यासह उमेद अभियानातील सीआरपी ताई उपस्थित होत्या.
या उपक्रमाद्वारे ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याची संधी मिळाली.महिला मोठ्या उत्साहाने या प्रदर्शनात सहभगी झाल्या होत्या.हा उपक्रम महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण टप्पा ठरला आहे.
उमेदच्या माध्यमातून भविष्यातही अशा उपक्रमांना चालना देण्यात येईल,असे आयोजकांनी यावेळी सांगितले.अशा उपक्रमामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढला असून,त्यांना आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा मिळाली आहे.

