सुरेश काटे,तलासरी
तलासरी येथे
ग्रामीण भागातील मुलींना प्रेरणा देणारा उपक्रम,
तलासरी तालुक्यात, गुजरातच्या सीमेवर औद्योगिक क्षेत्र जवळ असल्याने मुलांना सहज रोजगार मिळतो, त्यामुळे उच्च शिक्षणाकडे त्यांचा कल कमी असतो. विशेषतः मुलींच्या शिक्षणामध्ये मोठी हेळसांड होत असते.घरातील अशिक्षित पालकांमुळे मार्गदर्शनाचा अभाव आणि समाजात उच्च शिक्षण घेतलेल्या महिलांचे प्रमाण कमी असल्याने, मुलींना पुढे जाण्यासाठी योग्य दिशा मिळत नाही.
याच पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांना विशेषतः मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करण्यासाठी ” सन्मान नारीशक्तीचा,” हा अभिनव उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.३ ते ८ मार्च या कालावधीत शाळेने आपल्या परिसरातील शिक्षणाच्या जोरावर संघर्ष करून यश मिळवलेल्या महिलांना आमंत्रित करून त्यांचा गौरव करण्याचा संकल्प केला.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातील महिलांचा संघर्ष आणि यशाची कहाणी थेट ऐकण्याची संधी देणे,हा होता. मुलींना समजावे की, “आपणही शिक्षण घेऊन मोठे स्वप्न पाहू शकतो आणि त्यांना साकार करू शकतो,” यासाठी अशा महिलांना निमंत्रित करण्यात आले.ज्यांनी कठीण परिस्थितीतून मार्ग काढत उच्च शिक्षण घेतले आणि आज समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.
या उपक्रमात परिसरातील सहा कर्तृत्ववान महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला…
नीता विनोद धोडी – प्राथमिक शिक्षिका,सुमन मनोज भुरकुड- पदवीधर शिक्षिक, शुभांगी जयवंत खोत,मुख्याध्यापिका – माध्यमिक व उच्च माध्यमिक, शीतल विनोद धोडी – उपसरपंच, माजी सरपंच, सुजाता राठोड -आरोग्य सेविका,पूर्णिमा गणेश धोडी,पदवीधर तरुणी,
या महिलांनी आपली कौटुंबिक परिस्थिती, शिक्षणप्रवास,आलेल्या अडचणी,त्यावर केलेली मात, कुटुंबाचे सहकार्य,शिक्षकांचा प्रभाव, समाजातील आव्हाने आणि आजच्या जबाबदाऱ्या याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.मुलींनी त्यांची थेट मुलाखत घेतली,ज्यातून त्यांना शिक्षणाची ताकद आणि जिद्द कशी यशाकडे नेऊ शकते हे प्रत्यक्ष उदाहरणाद्वारे समजले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल नव्याने आत्मविश्वास निर्माण झाला.

