शुभम सावंत,विरार,
विवा महाविद्यालयात “अॅक्युप्रेशर अँड अॅक्यूपंक्चर,” व्याख्यान संपन्न,
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विवा महाविद्यालयात महिला सक्षमीकरण कक्ष आणि आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने “अॅक्युप्रेशर अँड अॅक्यूपंक्चर” या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.शैला सावंत, विवा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वी.श.अडिगल,उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे आणि उपप्राचार्या डॉ.दीपा वर्मा, महिला सक्षमीकरण कक्षाच्या प्रमुख प्राक्तना कोरे उपस्थित होते.
महिला सक्षमीकरण कक्ष आणि आयक्यूएसी यांच्या पुढाकाराने आयोजित या सत्राचे उद्दीष्ट अॅक्युप्रेशर आणि अॅक्यूपंक्चरच्या उपचारात्मक फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे हे होते. शरीरातील उर्जेचा प्रवाह संतुलित ठेवण्यासाठी दबाव आणि सुया वापरणाऱ्या या प्राचीन चीनी उपचारपद्धतींचे महत्त्व या सत्रात स्पष्ट करण्यात आले.
सर्टिफाइड अॅक्यूपंक्चरिस्ट आणि वेलनेस एक्स्पर्ट असलेल्या डॉ.शैला सावंत यांनी ताण – तणाव व्यवस्थापन,वेदना कमी करणे आणि आरोग्य सुधारण्यासाठी अॅक्युप्रेशर व अॅक्यूपंक्चर पद्धती कशा उपयोगी ठरतात, याविषयी सखोल मार्गदर्शन केले.महिलांना भेडसावणाऱ्या समस्या जसे की,हार्मोनल असंतुलन,मासिक पाळीतील तक्रारी आणि भावनिक असंतुलन,ताण – तणाव यावर या पद्धतींचा प्रभावी परिणाम होतो,असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सत्रादरम्यान सहभागींसाठी तणावमुक्ती आणि वेदना व्यवस्थापनासाठी उपयुक्त अशा सहजपणे घरात करता येण्याजोग्या अॅक्युप्रेशर तंत्रांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.त्यानंतर झालेल्या परस्पर चर्चेत सहभागी विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून या उपचारपद्धतीबाबत अधिक माहिती घेतली.या ज्ञानवर्धक सत्रामुळे उपस्थित विद्यार्थी, शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नैसर्गिक उपचारपद्धतींबद्दल मौल्यवान माहिती मिळाली.
या कार्यक्रमाला विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर,संस्थेच्या सेक्रेटरी अपर्णा ठाकूर,संस्थेचे खजिनदार शिखर ठाकूर, व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील,संजय पिंगुळकर,एस.एन.पाध्ये, विवा महाविद्यालयाचे समन्वयक नारायण कुट्टी इ.चे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या समारोपावेळी उपप्राचार्या डॉ. दीपा वर्मा आणि डॉ. प्रियांका ब्रिद यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडावा याकरिता महिला सक्षमीकरण कक्ष समिती सदस्य,प्राध्यापक,विद्यार्थी वर्ग यांनी मेहनत घेतली.

