दीपक मोहिते,
नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता,
राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी ” मल्हार सर्टिफिकेट,” या नावाने नवीन उपक्रम सुरु करण्याची घोषणा केली आहे.या निर्णयामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
याअंतर्गत राज्यभरात झटका मटण विकणाऱ्या दुकानांची नोंदणी केली करण्यात येणार आहे. हे प्रमाणपत्र मिळणारी दुकाने केवळ हिंदू समुदायातील लोक चालवतील,असं त्यामध्ये म्हंटलं आहे.
नितेश राणे यांनी आपल्या सोशल मिडीयावर एक पोस्ट करत म्हटलं आहे की, ” आज आज आम्ही महाराष्ट्रातील हिंदू समाजासाठी अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम ( https://malharcertification.com ) या निमित्ताने सुरू केलं आहे.मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटणाची दुकाने उपलब्ध होणार आहेत व त्यामध्ये १०० टक्के हिंदू समाजाचे प्राबल्य असेल. मटण विकणारी व्यक्ती देखील हिंदू असेल.कुठेही मटणामध्ये भेसळ झालेले आढळणार नाही.
मल्हार सर्टिफिकेशनचा वापर जास्तीत जास्त करावा, किंबहुना जेथे मल्हार सर्टिफिकेशन नसेल तेथे मटण खरेदी करू नये,असे आवाहन यानिमित्ताने त्यानी केले.या प्रयत्नांमुळे हिंदू समाजातील तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील,असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.” त्यामुळे नवीन वादाला आता तोंड फुटण्याची शक्यता आहे.
भारतात आधीच अस्तित्वात असलेल्या हलाल प्रमाणपत्राप्रमाणेच मल्हार प्रमाणपत्र सुरू करण्यात आले आहे,ज्यामध्ये मांस इस्लामिक कायद्यानुसार ( शरिया ) तयार केले जाते.झटका मटण त्या पद्धतीपेक्षा वेगळा आहे कारण यामध्ये प्राणी एकाच फटक्यात वेदनारहित मारला जातो.
नितेश राणे यांनी ” मल्हार सर्टिफिकेशन, ” नावाच्या नवीन प्लॅटफॉर्मच्या लाँचची घोषणाही केली.त्यांनी सांगितले की,हे व्यासपीठ फक्त हिंदू खाटिक समुदायाचे लोक चालवतील.ते म्हणाले, “आज आम्ही महाराष्ट्रातील हिंदू समुदायासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.या उपक्रमाद्वारे झटका मटण विकणारी प्रमाणित दुकाने हिंदू समुदायाला उपलब्ध करून दिली जातील.”
मंत्री नितेश राणे यांनी हिंदू समुदायाला मल्हार प्रमाणपत्र असलेल्या दुकानांमधूनच मटण खरेदी करण्याचे आवाहन केले.ते म्हणाले,” हे मल्हार प्रमाणपत्र शक्य तितके वापरले पाहिजे.मी सर्वांना आवाहन करतो की मल्हार प्रमाणपत्राशिवाय दुकानातून मटण खरेदी करू नका.
मल्हार सर्टिफिकेशनची अधिकृत वेबसाइट स्वतःला ” झटका मटण आणि चिकन विक्रेत्यांसाठी प्रमाणित व्यासपीठ,” म्हणून वर्णन करते.वेबसाइटनुसार, ” हिंदू धार्मिक परंपरेनुसार तयार केलेले बकरी किंवा मेंढीचे मांस,हे केवळ हिंदू खाटीक समुदायातील विक्रेत्यांकडून पुरवले जाते.” तसेच वेबसाइटमध्ये असे नमूद केले आहे की,त्यांचे मांस ” ताजे, स्वच्छ,लाळेपासून मुक्त आहे, आणि इतर कोणत्याही प्राण्यांच्या मांसात मिसळलेले नाही.” आता महाराष्ट्रातील लोकांकडून या उपक्रमाला किती पाठिंबा मिळतो आणि मटणाच्या बाजारावर त्याचा काय परिणाम होतो हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

