संजय लांडगे,वाडा
भिवंडी-वाडा-मनोर रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तात्काळ कारवाई करण्याचे आदेश,
भिवंडी-वाडा-मनोर या मार्गाच्या दुरुस्ती व डागडुजीचे काम ईगल इंट्रोडक्शन या कंपनीला दिले असून,सदर कंपनीने रस्त्याच्या एका बाजूचे संपूर्ण खोदकाम केले आहे. मात्र,हे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले आहेत.
सध्या वाहतूक सुरू असलेल्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून,संपूर्ण मार्गावर धुळीचे साम्राज्य आहे.यामुळे नागरिकांना व वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.या संदर्भात खा.डॉ.हेमंत सवरा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनिअर पालघर विभाग पोपट चव्हाण,प्रोजेक्ट मॅनेजर दीपक पवार व ठेकेदार यांना तातडीने वाड्यातील निवासस्थानी
बोलावून घेऊन रस्त्याच्या सध्या सुरू असलेल्या वाहतूक मार्ग सुस्थितीत करणे, रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांची तत्काळ दुरुस्ती करून वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या कामास गती द्यावी, जेणेकरून नागरिकांना अधिक काळ त्रास सहन करावा लागणार नाही. तसेच पावसाळ्याच्या तोंडावर रस्ता वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही या अनुषंगाने ट्राफिक नियंत्रित करणारे कर्मचारी नेमावे, दिशादर्शक फलक लावावे इ. सूचना केल्या.
नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित कार्यवाही करावी,अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल,असा स्पष्ट इशारा यावेळी सवरा यांनी दिला आहे.

