शुभम सावंत,विरार
जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा पालिकेतर्फे सन्मान, महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन,
महिलांचे मनोधैर्य व स्त्रीत्वाच्या सन्मानार्थ संपूर्ण जगभरात ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्ञानाची कवाडे खुली करत लाखो स्त्रियांना नवे क्षितीज दाखवले आणि त्यांच्या जीवनात नवी पहाट उगवली.समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये सर्वांचा सहभाग असावा व त्या दिशेने प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून ” जागतिक महिला दिन,” साजरा केला जातो. महिलांप्रती जिव्हाळा व आदर व्यक्त करुन त्यांचा सन्मान करुन समाजप्रबोधन घडवण्याच्या दृष्टीने सदर दिनाचे औचित्य साधून कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन वसई-विरार शहर महानगरपालिका महिला व बालकल्याण विभागामार्फत करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमामध्ये पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले,साहित्यिका वीणा गवाणकर,पल्लवी बनसोडे, वकील क्षेत्रातील अँड.मनिषा पाटील,उत्कर्षा दरवेशी, महिला पत्रकार वैष्णवी राऊत, क्रिडा क्षेत्रातील दिव्यांग खेळाडू निशा जरिवाला, कोमल भूषण पाटील,सिमा बंन्शिलाल वर्मा,क्रिडा क्षेत्रातील महिला खेळाडू समिधा अनंत चव्हाण, कामाक्षा प्रशांत ढेपे,सरिता शिवाजी बजबळकर,सुषमा जगदीश पाटील,संध्या अजय भुमकर,जिज्ञा सुजित राऊत, वृषाली प्रभाकर पाटील, अॅडेले रॉयल परेरा,महिला रिक्षाचालिका दर्शना दिनेश थालकर,प्रमिला ओरस्कर, महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागातील परिचारीका मनिषा कोटकर, मिनल पाटील,नयना पाखरे, महानगरपालिकेच्या सफाई कामगार सुनंदा घरत, रुक्मिणी आनंद गोहिल,शांता ईश्वर सोलंकी व बस कंडक्टर हर्षला सुर्यभान यांचा कर्तृत्ववान महिला म्हणून सन्मान आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला,
तसेच महानगरपालिकेतील महिला कर्मचारी यांस अॅड. मनिषा पाटील यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपायुक्त समीर भूमकर,उपायुक्त अर्चना दिवे, उपायुक्त नानासाहेब कामठे, उपायुक्त सुभाष जाधव व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
तसेच बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचे स्टॉल, महिलांकरीता आरोग्य शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम व “खेळ पैठणीचा अर्थात होममिनिस्टर इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमामध्ये कार्यालयातील महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

