अनंत भोईर,पालघर
जिल्हा परिषदेच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद,
जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद,पालघर येथे महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या उत्पादनांचे एकदिवसीय प्रदर्शन व विक्री मोठ्या उत्साहात पार पडले. मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.
गृहउद्योगाला चालना देण्यासाठी आयोजित या प्रदर्शनात पापड,लोणची, मसाले,वाळवणी पदार्थ,ताक, फ्रूट सलाड,आदी वस्तूंची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाने यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.
प्रकल्प संचालक डॉ.रूपाली सातपुते,उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक अतुल पारस्कर, शिक्षणाधिकारी संगीता भागवत,शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर,जिल्हा कृषी विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी तसेच इतर विभाग प्रमुखांनी आणि अधिकाऱ्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन स्वयंसहाय्यता गटाच्या महिलांसोबत,त्यांचे उत्पन्न व विक्री याबाबत संवाद साधला आणि त्यांच्याकडून वस्तू खरेदी करून त्यांना प्रोत्साहन दिले.
जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनीही उत्पादने खरेदी करून महिला गटांना प्रोत्साहन दिले. पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावरही हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.अधिकाधिक महिलांना आर्थिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून असे उपक्रम भविष्यातही राबवले जातील, असे जिल्हा परिषद प्रशासनाने यावेळी जाहीर केले.

