दिपक मोहिते,
लाडकी बहीण योजना ; फुगा लवकरच फुटण्याची शक्यता,
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारला राज्यातील ” बहिणी,” अचानक ” लाडक्या,” वाटू लागल्या व त्यांनी खिरापत वाटण्यास सुरुवात केली.आता त्यांचे हे खिरापत वाटणे,अंगलट येऊ लागल्यामुळे ज्या लाडक्या बहिणी निकषामध्ये बसत नाहीत,त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार असल्याचे सांगत सुटले आहेत.दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे संकेत दिले आहेत.
लाडकी बहीण योजना सुरू राहणार असली तरी ज्या महिला निकषामध्ये बसत नाहीत,त्यांना या योजनेतून आता वगळण्यात येणार आहे.आतापर्यंत अपात्र बहिणींची संख्या ९ लाखाच्या घरात पोहोचली आहे.विधानसभा
निवडणूका जिंकल्यानंतर सरकारने लाडक्या बहिणींना १५००/- ऐवजी २१००/- रु.देणार असल्याचे जाहीर आश्वासन दिले होते.पण ते आश्वासन हवेतच विरले.शासनाच्या अनेक विभागांनी विकासकामांसाठी आपल्याकडे निधीची कमतरता आहे,असे मत नोंदवल्यानंतर सरकारचे अवसान पार गळून पडले आहे.ही योजना मार्गी लागल्यानंतर सरकारी तिजोरीत असलेल्या ६० हजार कोटी रु.पैकी ४६ हजार कोटी रु.या योजनेवर खर्ची पडले.त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता सावध झाले आहेत व ते आता ही योजना चालूच राहणार आहे,पण सरकारी योजनांचा लाभ घेताना नियम व निकषांची पूर्तता केली पाहिजे,अशी निर्वाणीची भाषा सुरू केली आहे.दुसरीकडे देश व देशातील राज्यांचा जमाखर्च तपासणारे कॅग ( कंट्रोलर अँड ऑडिट जनरल ) यांच्याकडून राज्याच्या आर्थिक स्थितीचे विदारक चित्र समोर येण्याची शक्यता असल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांना आता शहाणपण सुचू लागले आहे.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतावर डोळा ठेवून घेतलेला हा निर्णय आता सरकारच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.निवडणुकीच्या काळात गुलाबी रंगाचे कपडे घालून मिरवणाऱ्यावर लवकरच नागडे होण्याची पाळी येणार आहे.अनेक सरकारी विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत.एसटी कामगारांचे पगार गेल्या तीन वर्षापासून कधीही वेळेवर झाले नाहीत.त्यामुळे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक जमिनी विकण्याच्या प्रयत्नात आहेत.राज्याची आर्थिक स्थिती चांगलीच डबघाईला आली असून फडणवीस हे आता नियम व निकषांमध्ये ज्या महिला बसत नाहीत,त्यांना लाभ देता येणार नाही,असे सांगत सुटले आहेत.लाडक्या बहिणीच्या नावाने जो फुगा या नेत्यांनी आकाशात सोडला होता,तो आता हळूहळू खाली येत असून त्या फुग्याचा लवकरच कपाळमोक्ष होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

