जव्हार प्रतिनिधी,
जव्हार येथे तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेचे आयोजन,
जव्हार प्रतिनिधी-
पंचायत समिती शिक्षण विभाग,जव्हार यांच्या वतीने के. व्ही. हायस्कूल,जव्हार येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. केंद्रस्तरातून निवड झालेल्या १६ शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.या स्पर्धेच्या आयोजनासाठी गटशिक्षणाधिकारी विजया टाळकुटे व विस्तार अधिकारी शिक्षण मनीषा डांगे यांनी विशेष नियोजन केले.बचत गटांना प्रोत्साहन मिळावे म्हणून शासनातर्फे पारितोषिके ठेवण्यात आली होती.सदर स्पर्धेचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी विजया टाळकुटे व विस्तार अधिकारी मनीषा डांगे शिक्षक राजेंद्र जोरी व इतर मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर पाककला स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी पंचायत समिती जव्हारचे सहा.प्रशासन अधिकारी व्ही. एस. महाले, तालुका व्यवस्थापक पेसा मनोज कामडी आणि भारती विद्यापीठ,जव्हारच्या शिक्षिका छाया भामरे यांनी परीक्षक म्हणून भूमिका बजावली.स्पर्धेच्या परीक्षकांनी पाककृतींचे परीक्षण करताना फोर्टीफाईड तांदळाचा वापर, तृणधान्यांचा समावेश,चव, नावीन्यपूर्ण सादरीकरण, पाककृतीची सुलभता आणि इंधन बचत या निकषांचा विचार केला.कमी वेळेत अधिक पदार्थ तयार करणे, इंधन बचत आणि सादरीकरण यासह आहारातील नाविन्यतेच्या आधारे तीन शाळांची विजेते म्हणून निवड करण्यात आली.
प्रथम क्रमांक – जिल्हा परिषद शाळा कुंडाचापाडा ( केंद्र: केळघर )
द्वितीय क्रमांक – जिल्हा परिषद शाळा काळीधोंड ( केंद्र: धानोशी )
तृतीय क्रमांक – जिल्हा परिषद शाळा वडोली ( केंद्र: देहरे )
सर्व सहभागी शाळांना गटशिक्षणाधिकारी विजया टाळकुटे व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी केंद्रप्रमुख, के. व्ही. हायस्कूलच्या मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या सांगतेस आभारप्रदर्शनाने करण्यात आली. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये पौष्टिक आहाराचे महत्त्व आणि सर्जनशील पाककौशल्याचा विकास होण्यास मोठी मदत झाली.

