वसंत भोईर,वाडा,
घरपट्टी वसुलीसाठी ग्रामपंचायतीने कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर वाजवला बॅन्ड
तालुक्यातील घोणसई ग्रामपंचायत हद्दीतील काही कारखानदार हे दोन तीन वर्ष उलटूनही घरपट्टी भरत नाहीत. वारंवार बिले बजावूनही त्याची दखल घेतली जात नाही.मार्च महिना उजाडला तरी अनेक कारखानदार घरपट्टी भरीत नसल्याने आज ग्रामपंचायतीने कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बॅन्ड वाजवून त्यांना जागे करण्याचा अनोखा फंडा वापरला.या अनोख्या फंड्याची चर्चा तालुकाभर होत आहे.
घोणसई मेट ग्रामपंचायत हद्दीतील अनेक कारखान्यांच्या घरपट्ट्याची थकबाकी अनेक वर्षापासून आहे.वारंवार बिले बजावूनही अनेक उद्योजक त्या भरण्यास टाळाटाळ करीत आहेत.अनेक कारखाने सुस्थितीत चालू असतानाही ते बिले भरण्यास टाळाटाळ करीत आहेत.वर्ष अखेर मार्च महिन्याचा पहिला आठवडा उलटला तरी उद्योजक घरपट्टी भरण्यास टाळाटाळ करीत आहेत.अखेर ग्रामपंचायत कमिटीने प्रत्येक कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर बॅन्ड वाजवून त्यांना जागे करण्याचा ठराव मासिक सभेत केला.आणि त्यानुसार आज अनेक कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर बॅन्ड वाजवून त्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला.याची दखल घेत काही उद्योजकांनी येत्या एक दोन दिवसात काही रक्कम भरण्याचे आश्वासन ग्रामपंचायत कमिटीला दिले.
या कार्यक्रमात घोणसई ग्रामपंचायतीच्या सरपंच शैला जाबर,उपसरपंच विशाल पाटील,ग्रामपंचायत अधिकारी तेजस भुजबळ,सदस्य दिलीप पाटील,अशोक घोरकणे, विजयेता भोईर,कर्मचारी विश्वनाथ पाटील आदी सहभागी झाले होते.

