सुरेश वैद्य,सफाळे
पालघर जिल्हा परिषदेत उद्या एक दिवसीय प्रदर्शन व विक्री,
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद पालघर येथे महिला स्वयंसहायता समूह गटांचे एकदिवसीय प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ( उमेद ) तर्फे उद्या सकाळी नऊ ते सहा वाजेपर्यंत जिल्हा परिषद इमारतीच्या प्रवेशद्वारावर हे प्रदर्शन आयोजित करण्यात आहे आहे.
जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमाला जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तसेच जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्या अभ्यागतांनी प्रदर्शनाला भेट देऊन महिला बचत गटांकडून उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.महिला गटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि स्वयंपूर्णतेसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहेअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
तसेच हा उपक्रम पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत स्तरावर देखील राबवण्यात येणार आहे.
या प्रदर्शनामध्ये घरगुती पापड, लोणचे,मसाले,वाळवणी पदार्थ,ताक,फ्रूट सलाड आणि इतर उत्पादनांची विक्री केली जाणार आहे.स्थानिक महिलांना रोजगाराची संधी मिळावी आणि त्यांच्या उत्पादक क्षमतेला प्रोत्साहन मिळावे,हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
उद्या होणाऱ्या या विक्री प्रदर्शनाला जिल्हा परिषद अधिकारी,कर्मचारी तसेच नागरिकांनी आवर्जून भेट देऊन महिला गटांना पाठबळ द्यावे,असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक डॉ.रूपाली सातपुते यांनी केले आहे.

