नाशिक प्रतिनिधी
नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीला शासनाची मंजूरी …
नाशिक विमानतळावरील सध्या अस्तित्वात असलेल्या धावपट्टीला समांतर,अशी नवीन धावपट्टी निर्माण करण्याचा निर्णय हिंदुस्तान एरोनॉटिक्सने घेतला असून या धावपट्टीसाठी २०० कोटी रु. मंजूर करण्यात आले आहेत.त्यामुळे नाशिक विमानतळाच्या विकासासाठी गती मिळणार आहे.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत या धावपट्टीला मंजुरी देण्याची मागणी केली होती.या मागणीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या पडताळणी सुविधेसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्सला मान्यता दिली आहे.त्यामुळे भविष्यात नाशिक विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमान सेवाही सुरू करणे शक्य होणार आहे.हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या संचालक मंडळाने या नवीन धावपट्टीच्या उभारण्यासाठी २०० कोटी रु.च्या निधीस मंजुरी दिली आहे.या निर्णयामुळे नाशिक विमानतळाची उड्डाणक्षमता अधिक वाढणार आहे.या निर्णयानंतर नवीन धावपट्टीचे आरेखन व इतर तांत्रिक बाबींसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्सकडून सल्लागार एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे.संबंधित एजन्सीकडून तांत्रिक सर्वेक्षण सुरूही करण्यात आले आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या धावपट्टीला समांतर धावपट्टी तयार करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे.तांत्रिक सर्वेक्षण पूर्ण होताच ही धावपट्टी तयार करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.या धावपट्टीचे काम पूर्ण होण्यास साधारणतः २ वर्षांचा कालावधी लागणार आहे.नवीन धावपट्टी ही सध्याच्या धावपट्टीप्रमाणेच ३ कि.मी.लांब व ४५ मीटर रुंद असणार आहे.२०२२ साली धावपट्टीची डागडुजी सुरू असताना तब्बल १४ दिवस नाशिकचे विमानतळ बंद ठेवण्यात आले होते.नवीन धावपट्टीच्या निर्मिती करतानाही विमानतळ सुरु ठेवणे शक्य होणार आहे.

