जव्हार प्रतिनिधी,
जव्हार येथे ब्रेस्ट कॅन्सर चाचणी शिबिर संपन्न,
महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती आणि त्वरित निदान हे अत्यंत महत्त्वाचे असून,त्याच उद्देशाने ग्राम मैत्रीण बचत गट महासंघ, जव्हार आणि बोईसर तारापूर रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रेस्ट कॅन्सर चेकअप कॅम्प आयोजित करण्यात आला.या शिबिरात एकूण ८० महिलांची मोफत तपासणी करण्यात आली.
या सामाजिक उपक्रमासाठी अनेक मान्यवरांनी सहकार्य केले.
कार्यक्रमात डॉ.सोनम खंडेझोड (अवेन्यू चेअर ब्रेस्ट कॅन्सर ),वैशाली शिंदे ( प्रोजेक्ट इन्चार्ज,बोईसर तारापूर रोटरी क्लब ), प्रा.संध्या शहापुरे ( जागृती प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर ),प्राची कडव,वैभवी धोंडगे ( टेक्निशियन,नोव्हा लॅब आणि यु.ई.लाइफ सायन्सेस ) यांनी मार्गदर्शन केले.तसेच, ग्राम मैत्रीण बचत गट महासंघाच्या अध्यक्ष प्राध्यापिका डॉ.प्रज्ञा कुलकर्णी,सचिव कामिनी मेघपुरिया आणि डॉ.अनिता पाटील यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.ब्रेस्ट कॅन्सरचा धोका ओळखण्यासाठी आणि लवकर निदानासाठी अशा शिबिरांचे आयोजन गरजेचे आहे.महिलांनी नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शन मान्यवरांनी केले. शिबिरादरम्यान महिलांना ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे,त्याचे कारणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि स्वतः चाचणी कशी करावी याबाबत सखोल माहिती देण्यात आली.
या उपक्रमाद्वारे महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण झाली.भविष्यातही अशा आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येईल,असे आयोजकांनी सांगितले.महिलांनी या उपक्रमाला मोठा प्रतिसाद दिला आणि भविष्यात देखील अशाच आरोग्यविषयक शिबिरांचा लाभ घेण्याची इच्छा व्यक्त केली.

