संदीप जाधव,बोईसर,
तारापूर येथे महाआरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन,
तारापूर अणुशक्ती केंद्र आणि जिल्हा परिषद,पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा.आ.केंद्र, तारापूर येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर संपन्न झाले.या शिबिरामध्ये तारापूर पंचक्रोशीतील ४०० हून अधिक नागरिक सहभागी झाले होते.यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक रामदास मऱ्हाड उपस्थित होते.
शिबिरामध्ये नागरिकांसाठी विविध आरोग्य तपासण्या आणि उपचार सेवा उपलब्ध करण्यात आल्या होत्या.रक्तदाब,रक्तशर्करा, मुखाचा,स्तन, गर्भाशय व मुखाची कर्करोग तपासणी, तसेच गरोदर माता आणि नवजात बालकांच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. याशिवाय सिकल सेल, सामान्य आजारांचे निदान व उपचार करण्यात आले.
पालघर जिल्ह्यात गर्भवती महिलांमध्ये वाढत्या रक्तक्षयाच्या (अॅनिमिया) समस्येच्या पार्श्वभूमीवर, तारापूर अणुशक्ती केंद्राच्या सामाजिक उत्तरदायित्व ( सीएसआर ) उपक्रमांतर्गत आरोग्य विभागाला एफ.सी.एम.इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आले. यासोबतच अत्याधुनिक तोंडाचा कर्करोग तपासणी यंत्र आणि सिकल सेल निदान यंत्राचे लोकार्पण करण्यात आले.
तसेच गरोदर महिलांसाठी ” सुपोषण किट,” चे वाटप करण्यात आले.जे त्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
या शिबिराला तारापूर अणुशक्ती केंद्राच्या सामाजिक उपक्रमांचे प्रमुख मिश्रा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी,जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ.सागर पाटील,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.तनवीर शेख, तसेच तारापूर अणुशक्ती केंद्राचे अधिकारी डॉ.श्याम बिहारी आणि प्रभुपाद दास यांनी भेट देऊन पाहणी केली.
शिबिराच्या आयोजनामध्ये डॉ. वैभवी देशपांडे,डॉ.उमेश अहिरे,मानसेवी वैद्यकीय अधिकारी,समुदाय आरोग्य अधिकारी,औषध निर्माण अधिकारी,प्रयोगशाळा अधिकारी,आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक-सेविका, गटप्रवर्तक आणि आशा ताई यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
ग्रामस्थांनी या मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार सुविधांचा लाभ घेतला व समाधान व्यक्त केले आणि भविष्यातही अशा शिबिरांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

