संदीप जाधव,बोईसर
वारांगडे येथे फर्निचर दुकानाना भीषण आग ; सात दुकाने जळून खाक,
वारांगडे येथील फर्निचर मार्केटमध्ये पहाटे भीषण आग लागली.या आगीतसात एकमेकांना लागून असलेली सात दुकाने खाक झाली.
आगीची भीषणता इतकी होती की संपूर्ण परिसर धुराच्या लोटाने भरून गेला. सकाळी साडेसातच्या सुमारास ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.मात्र आग कशामुळे लागली याबाबत कोणतेही कारण अद्याप समोर आलेले नाही.
येथे फर्निचरची दुकाने दाटीवाटीने एकमेकांना लागुन असल्यामुळे आग झपाट्याने पसरत गेली.विशेष म्हणजे,या भागात कोणतीही सुरक्षिततेची व्यवस्था नसल्यामुळे अशा घटना वारंवार घडत असतात.या घटनेची खबर मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.मात्र दुकाने एकमेकांना लागून असल्याने पाण्याचा फवारा मारून आग विझवण्यात अडचणी आल्या.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून,आगीच्या कारणाचा शोध घेत आहेत. आगीमुळे लाखो रु.चे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
यापूर्वीही वाघोबा खिंड,गुंदले येथे शॉर्टसर्किटमुळे १० ते १२ दुकाने जळून खाक झाली होती.अशा घटना घडू नयेत, यासाठी नागरिकांनी वारंवार सुरक्षिततेच्या उपाययोजनांची मागणी केली असली तरी प्रशासनाकडून आजवर दुर्लक्षच केले गेले.
दुकानांची दाटीवाटी, सुरक्षिततेची यंत्रणा नसणे, आग विझवण्याची साधने अपुरी असणे,या सगळ्या बाबींमुळे वारंवार अशा घटना घडत आहेत.निदान आता तरी प्रशासन जागे होईल का ? अशी विचारणा नागरिकांकडून करण्यात येत आहे.

