नाशिक प्रतिनिधी,
नाशिकच्या मोगली कॅफेवर आ.देवयानी फरांदे यांचा छापा,
नाशिकमध्ये कॅफेचे जाळे पसरत चालले असून या कॅफेंमध्ये मोठ्या प्रमाणावर अश्लील वर्तन केले जात असल्याच्या तक्रारी वारंवार होत होत्या.याविषयी पोलीस प्रशासनाकडे तक्रार करून देखील त्याबाबत आवश्यक ती कारवाई केली जात नव्हती. त्यामुळे आ.देवयानी फरांदे यांनी नाशिकच्या मध्यवर्ती भागात गंगापूर रोड येथे सुरू असलेल्या मोगली कॅफे येथे स्वतः धाड टाकून दिवसाढवळ्या सुरू असणारे अनैतिक व अश्लील कृत्य करणाऱ्या युवक युवतींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
याविषयी माहिती देताना आ.देवयानी फरांदे म्हणाल्या, नाशिक शहराचा एक सांस्कृतिक वारसा असून जाणीवपूर्वक नाशिकचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहरात अनेक ठिकाणी कॅफे सुरु झाले असून या कॅफेमध्ये अनेक अनधिकृत बांधकामे झाली आहेत.या कॅफेंकडे पोलीस प्रशासनासह महानगरपालिकेच्या प्रशासनाचे देखील दुर्लक्ष होत असून यामुळे तरुण पिढी बिघडत आहे.त्यामुळे पोलीस प्रशासनाने या कॅफेंवर कारवाई करावी,अशी मागणी मी वारंवार केली, परंतु पोलीस प्रशासनाकडून याबाबत दखल घेतली गेली नाही त्यामुळे नाशिकचे सांस्कृतिक वैभव टिकवण्यासाठी गंगापूर रोड सारख्या मध्यवर्ती ठिकाणी धाड टाकण्यात येऊन अश्लील कामकाज करणाऱ्या युवक युवतींना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.. तसेच या ठिकाणी करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाची माहिती महानगरपालिका प्रशासनाला देखील देण्यात आली आहे.पोलीस प्रशासनाने व महानगरपालिकेने याबाबत तत्काळ कारवाई करून कॅफेमध्ये सुरू असलेले अनाधिकृत व अश्लील कामकाज बंद करावे व नाशिकचा सांस्कृतिक वारसा टिकवण्यासाठी मदत करावी असे आवाहन त्यांनी केले.
याबाबत तत्काळ कारवाई करण्यात न आल्यास नाशिक शहरात इतर ठिकाणी जाऊन देखील कॅफे बंद करण्याचे काम करावे लागेल,असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

