वसंत भोईर,वाडा
महाशिवरात्रीसाठी तिळसेश्वर मंदिर सज्ज
वाडा तालुक्यातील प्राचीन प्रौराणिक पांडवकालीन तीलशेश्वर महादेवाचे मंदिर वाडा शहरापासून आठ कि.मी. अंतरावर निसर्गरम्य अशा तिसरा गावी आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते.या यात्रेसाठी ठाणे, पालघर जिल्ह्यातील वाडा, शहापूर,विक्रमगड,जव्हार, मोखाडा ,पालघर डहाणू, तलासरी,वसई या तालुक्यातील भाविकांची मोठी गर्दी होते.वाडा, भिवंडी ,शहापूर आगारातून एसटीची खास व्यवस्था करण्यात आली आहे.जीप व रीक्षांची खाजगी वाहतुक मोठ्या प्रमाणात येथे होत असते.

मंदिराच्या बाजूलाच असलेल्या वैतरणा नदीच्या डोहात मासे आहेत.कुंडातील मासे भाविकांना शिवरात्र व होळी या दोन दिवशी दिसतात,अशी दंतकथा आहे. या मंदिराचा संबंध भारतातील बारा ज्योतिर्लिंगांमध्ये गणल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर महादेवाच्या मंदिराशी असल्याचा पौराणिक व ऐतिहासिक संदर्भ आहे. वैतरणा नदीवर मंदिरात जाण्यासाठी पूल बांधल्यामुळे मंदिराची शोभा द्विगुणित झाली आहे.
येथील नदीचे मूळ गोदावरीच असून ती ब्रह्मगिरीतून आली आहे.येथे तीळशेश्वराची स्वयंभू पिंड आहे.पिंडीवर टाकलेले नाणे नदीतील मासे असलेल्या कुंडात पडत असते,अशी श्रद्धा आहे. या मंदिरातील देवाची पूजाअर्चा येथील पुजारी करत असतात.

