दीपक मोहिते,
अत्यंत संवेदनशील प्रकरण,
युएसएडच्या भारतातील फंडिंगची सखोल चौकशी झाली पाहिजे…
अमेरिकेतील यूएसएड ही संस्था वादाच्या भोवऱ्यात सापडली असून भारतातील त्यांच्या प्रतिनिधीवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला होणारी युएसएड अंतर्गत फंडिंग तात्काळ बंद केली आहे.या सर्व घडामोडीमुळे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन देखील वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
त्यामुळे भारताच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी दावा केला आहे की,अमेरिकेच्या ” युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट,” ( यूएसएड ) ने भारतात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांची संख्या वाढवण्यासाठी २१ दशलक्ष डॉलर्स ( सुमारे १८२ कोटी रु. ) वित्तपुरवठा केला होता.
ट्रम्प यांच्या विधानाममुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.भारतात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अमेरिकेच्या निधीची गरज का व कोणाला पडली ? तसेच,या निधीच्या माध्यमातून माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भारताच्या निवडणुकीत कोणाला आणि जिंकुन आणण्यासाठी प्रयत्न करत होते ? त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर भाजप आणि काँग्रेसमध्ये सध्या चर्चा सुरू झाली आहे.या चर्चेमध्ये यूएसएडच्या भारतातील माजी प्रमुख वीणा रेड्डी यांचं नावही समोर आलं आहे.
” बायडेन यांनी भारतीय निवडणुकीत हस्तक्षेप केला, ” असा गंभीर आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
भाजप खा.महेश जेठमलानी यांनी वीणा रेड्डी यांच्यावर यूएसएडच्या निधीबाबत गंभीर आरोप केले आहेत.एलॉन मस्क यांच्या अमेरिकेच्या ” डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नेंट एफिशिएंसी, “( डीओजीइ ) या संस्थेने भारतातील यूएसएडच्या निधीबाबत काही खुलासे केले होते.डीओजीइच्या माहितीनुसार,यूएसएडने भारतातील मतदान वाढवण्यासाठी मोठा निधी खर्च केला होता.वीणा रेड्डी यांची २०२१ मध्ये यूएसएडच्या भारतीय मिशन प्रमुख म्हणून नियुक्ती झाली होती.मात्र,भारतीय तपास संस्थांनी त्यांना प्रश्न विचारण्याआधीच त्या लोकसभा निवडणुकीनंतर एका महिन्यात म्हणजेच १७ जुलै २०२४ रोजी अमेरिकेत परत निघून गेल्या.
सध्या चर्चेत असलेल्या वीणा रेड्डी,या मूळ भारतीय वंशाच्या अमेरिकन राजनियक आहेत. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशात झाला असून,त्या अमेरिकेच्या वरिष्ठ परराष्ट्र सेवेत कार्यरत होत्या.५ ऑगस्ट २०२१ रोजी त्यांची युएसएडच्या भारतातील कार्यलयात प्रमुख म्हणून निवड झाली.रेड्डी या भारत आणि भूतानमधील यूएसएडच्या मिशन डायरेक्टर म्हणून काम करणाऱ्या पहिल्या भारतीय-अमेरिकन महिला आहेत.
वीणा रेड्डी यांनी युएसएडच्या मिशन डायरेक्टर म्हणून भारतात तीन वर्षांच्या कार्यकाळात विविध प्रकल्पावर काम केले आहे. त्यांच्या कार्यकाळात भारतीय रेल्वे,उर्जा मंत्रालय,नीति आयोग,आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय,अटल इनोव्हेशन मिशन,यांसारख्या संस्थांशी अनेक सामंजस्य करार एमओयु करण्यात आले. तसेच,युएसएड अंतर्गत विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली.
रेड्डी या अनेक उच्चस्तरीय सरकारी कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असायच्या.त्यांच्या सहभागामुळे यूएसएड आणि भारत सरकार यांच्यामध्ये सहकार्य वाढत गेले. मात्र,२०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील यूएसएडच्या निधीबाबत झालेल्या वादामुळे त्या आता चर्चेत आल्या आहेत.युएसएडच्या या निधीमुळे भारतातील निवडणुकीत विदेशी हस्तक्षेप झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे हा विषय अधिक संवेदनशील बनला आहे.
” भारताकडे भरपूर पैसा आहे,मग त्यांना अमेरिकेच्या मदतीची गरज का भासली ? असा प्रश्न डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारला आहे.या प्रकरणी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षानी स्वतःहून काही संवेदनशील मुद्दे उपस्थित केल्यामुळे भारतीय तपास यंत्रणाही आता खडबडून जाग्या झाल्या आहेत.

