जव्हार प्रतिनिधी,
जव्हार येथे ३० जलचक्राचे वाटप,गरजू महिलांना मिळाला दिलासा,
जव्हार तालुक्यातील टंचाईग्रस्त झाप गावात वेल्स ऑन व्हील्स संस्थेच्या वतीने आज ३० पाण्याचे रोलर ड्रम ( जलचक्र ) वाटप करण्यात आले.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शहाज मेनन यांच्या संकल्पनेनुसार हा उपक्रम राबवण्यात आला.
या माध्यमातून पाणी वाहून नेण्याची पारंपरिक डोक्यावर हंडा ठेवून चालण्याची पद्धत संपुष्टात येणार असून,गरजू महिला व मुलींना मोठा दिलासा मिळणार आहे.
झाप गावातील पाण्याच्या टंचाईची माहिती मिळाल्यानंतर संस्थेचे प्रतिनिधी नारायण गभाले यांनी गावाला भेट दिली. गावातील वस्तीची पाहणी करून त्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला. गावातील नागरिक व महिलांशी संवाद साधून पाणीटंचाईमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आली.यामध्ये मुलींना व महिलांना दूरवरून पाणी आणण्यासाठी रोजच्या होणाऱ्या त्रासावर लक्ष केंद्रित करण्यात आले.या पार्श्वभूमीवर ड्रम वाटपाचा निर्णय घेण्यात आला.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश मुलींनी पाण्यासाठी वाया जाणारा वेळ वाचवून त्यांना शिक्षणासाठी अधिक वेळ देणे हा होता.पाण्यासाठी होणाऱ्या पायपिटीमुळे मुलींना अनेकदा शाळेत जाता येत नसे. पाण्याचे ड्रम उपलब्ध झाल्यामुळे ही समस्या मोठ्या प्रमाणावर सुटणार आहे.ड्रम वाटपाच्या या प्रसंगी गावातील सर्व महिलांच्या चेहऱ्यावर समाधान होते.महिलांना आता पाण्यासाठी कमी कष्ट घ्यावे लागणार असल्याने त्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमाला नारायण गभाले, विजय देवरे,सुमित पाटील, संकेत बिडगर,कौस्तुभ दोंदे, रणजीत कारके हे संस्थेचे प्रतिनिधी व झाप गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.जयश्री पोटिंदा, लता पोटिंदा,सुनीता वळे, यमुना पोटिंदा,प्रमिला पोटिंदा, गुलाब लोखंडे यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले.कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
वेल्स ऑन व्हील्स संस्थेच्या या उपक्रमामुळे झाप गावातील महिलांना आणि मुलींना एक नवा दिलासा मिळाला असून पाणीटंचाईच्या झळांवर मात करण्यासाठी ही मदत महत्त्वाची ठरणार आहे.

