संजय लांडगे,वाडा
वाडा – कोनसई येथे आगीत घर जळून खाक : लाखो रु.चे नुकसान,
वाडा तालुक्यातील कोनसई गावातील एका शेतकऱ्याच्या घराला रात्रीच्या सुमारास आग लागली.या आगीत त्यांचे राहते घर जळून खाक झाले आहे.
कोनसई गावातील शेतकरी नंदकुमार यादव मोकाशी व बाळकृष्ण यादव मोकाशी या दोघा भावंडांचे घर असून कामानिमित्त बाळकृष्ण मोकाशी हे वाड्यात राहतात तर नंदकुमार मोकाशी हे आपल्या कुटुंबासह येथे राहात होते.रात्री साधारण दीडच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असे बाळकृष्ण मोकाशी यांनी सांगितले.
मोकाशी यांच्या घराचे छत कौलारू असून त्यामध्ये जास्तीत जास्त लाकडांचा वापर केला होता.त्यामुळे आगीने थोड्याच वेळात रौद्र रूप धारण केले व बघता बघता घर व घरातील कपडे, अन्नधान्य,कपाट,टेबल संसारोपयोगी साहित्य सर्व काही जळून राख झाले.पहाटे तीनच्या सुमारास वाडा नगरपंचायतची अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तो पर्यंत मोकाशी यांच्या घराचे होत्याच नव्हतं झालं होते.
नंदकुमार मोकाशी यांचा संसार सध्या उघड्यावर पडला असून त्यांनी शासकीय दरबारी मदतीची मागणी केली आहे.या दुर्घटनेत २५ लाख रुपयांच्या आसपास नुकसान झाले आहे.सकाळी तलाठी व ग्रामसेवक यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असल्याची माहिती बाळकृष्ण मोकाशी यांनी दिली आहे.

