सुरेश वैद्य,सफाळे
शिक्षण महर्षी र.स.राऊत यांचे शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान – पालकमंत्री नाईक,
समाजातील अशिक्षित समूहाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक संस्था स्थापन करून समाजातील अनेक घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात सामील केले.शिक्षण महर्षी रघुनाथ सखाराम राऊत यांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कार्य करून भरीव योगदान दिले असल्याचे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.
माहिम शिक्षण संस्थेच्या संकूल क्र.२ चे रघुनाथ सखाराम राऊत संकूल असे नामकरण व उद्घाटन माहिम – पालघर येथे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर खा.हेमंत सवरा,आ.राजेंद्र गावित,जिल्हाधिकारी गोविंद बोडके,माहिम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अजय ठाकूर, उपाध्यक्षा निलम राऊत, , शिक्षणाधिकारी संगिता भागवत,सरपंच प्रिती पाटील, रजनी राऊत आदि मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री नाईक आपल्या भाषणात पुढे म्हणाले,या परिसराचा विकास होऊन शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे,यासाठी राऊत हे नेहमी सकारात्मक भूमिका घेत असत.शैक्षणिक क्षेत्रामुळे समाजात सकारात्मक जडण-घडण होत असते.त्यासाठी शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे.माहिम शिक्षण संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात उत्तम प्रगती केली आहे.यापुढेही ही संस्था अशीच प्रगती करीत राहील.या शिक्षण संस्थेचे शिक्षण महर्षी रघुनाथ सखाराम राऊत यांनी ही शैक्षणिक संस्था उभी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत.याच परिश्रमाचे फळ म्हणून आज ही संस्था नावारुपाला आली असून शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी माहिम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अजय ठाकूर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

