अवजड वाहनांच्या त्रासाने मुंगूस्ते ग्रामस्थ त्रस्त : दोन तास वाहने रोखून धरली,
तालुक्यातील मुंगूस्ते येथील ग्रामस्थ अवजड वाहनांच्या त्रासाने त्रस्त झाले असून वैतागलेल्या नागरिकांनी आज सकाळी अकराच्या सुमारास गो-हे – कंचाड रस्त्यावरील सुरू असलेली अवजड वाहनांची वाहतूक मुंगूस्ते ग्रामस्थांनी रोखून धरली.अखेर पोलिसांनी आंदोलन स्थळी धाव घेऊन आंदोलनकर्त्या ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या दोन दिवसात सोडवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर अवजड वाहनाना सोडण्यात आले.
या परिसरात मोठ्या प्रमाणात दगडखाणी आहेत शिवाय उरण – बडोदरा महामार्गासाठी लागणारी माती याच मार्गाने नेली जात असल्याने सध्या या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे.त्यामुळे या रस्त्याची पार दुरावस्था झाली आहे. शिवाय सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे.नागरिकांची घरे धुळीने माखलेली आहेत.या धुळीचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. ही वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने विद्यार्थी, अबालवृद्ध,महिला यांना हा रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागते.या सर्व समस्या तत्काळ सुटाव्यात, यासाठी आज मुंगूस्ते गावातील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत अवजड वाहतूक करणारी सर्व वाहने दोन तास रोखून धरली.दरम्यान पोलिसांच्या मदतीने दोन दिवसात मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले.परंतु दोन दिवसात पूर्तता न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला.

